ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढल्या; माजी खासदारावर 25000 कोटींच्या घोटाळ्याचे गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 08:23 AM2020-06-10T08:23:49+5:302020-06-10T08:25:19+5:30
सिंह यांच्यावर आणि कंपन्यांवर कानपूरमध्ये 5 सप्टेंबर 2019 मध्येच गुन्हे दाखल झाले आहेत. चकेरीच्या पवन मिश्रा यांनी पहिला एफआयआर नोंदविला होता.
उत्तर प्रदेश सरकारने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या माजी खासदाराविरोधात फास आवळायला सुरुवात केली आहे. कंवर दीप सिंह यांच्या अलकेमिस्ट इन्फ्रा रियलिटी, टाउनशिपसह अन्य कंपन्यांनी लोकांचा तब्बल २५ हजार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआय तपास करण्याची मागणी केली आहे. त्यांच्यावर कानपूरच्या शेकडो गुंतवणूकदारांचे पैसे हडपल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी कानपूरच्या पोलीस ठाण्यामध्ये माजी खासदार आणि त्यांच्या कंपन्यांच्या सहा संचालकांविरोधात आधीच गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर कानपूरमध्ये २९१ लोकांचे कोट्यवधी रुपये हडप केल्याचा आरोप आहे. तर देशभरात कंवर दीप सिंह यांच्यावर २५ हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात कोलकाता आणि अन्य राज्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.
सिंह यांच्यावर आणि कंपन्यांवर कानपूरमध्ये 5 सप्टेंबर 2019 मध्येच गुन्हे दाखल झाले आहेत. चकेरीच्या पवन मिश्रा यांनी पहिला एफआयआर नोंदविला होता. यामध्ये संचालक सतेंद्र कुमार सिंह, सचेता खेमका, जय श्रीप्रकाश सिंह, बृज मोहन महाजन छत्रपाल, नरेंद्र सिंह रानावत आणि नंदकिशोर सिंह यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संचालकांनी लोकांना मोठ्या फायद्याचे लालच देवून प्लॉट आणि अन्य ठिकाणी रक्कम गुंतविली आणि हडपली. या प्रकरणी वकील अजय टेडन हे सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडत असून ते देखील या घोटाळ्यामध्ये पीडीत आहेत. त्यांच्या आरोपानुसार सिंह यांच्या 11 कंपन्यांनी कानपूरमध्ये १० हजारावर लोकांकडून पैसे लुटले असून १००० कोटी रुपये हडप केले आहेत. तर देशभरात हा आकडा २५००० कोटींवर जात आहे.
या बोगस कंपन्यांच्य़ा फसवणुकीची व्याप्ती पश्चिम बंगालपासून दिल्ली. बिहार, युपी, मध्ये प्रदेश आणि पंजाबपर्यंत पसरलेली आहे. टंडन यांनी 2019 मध्येच सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने गृह विभाग आणि डीजीपी मुख्यालयाद्वारे कानपूर पोलिसांकडून रिपोर्ट मागितला होता.
ईडी कडून कारवाईला सुरुवात
हा हाय प्रोफाईल घोटाळा असल्याने ईडीनेही यामध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. ईडीच्या टीम 20 सप्टेंबरला सिंह यांच्या कोलकाता, दिल्ली आणि चंदीगढच्या सात ठिकाणांवर छाप्यासाठी गेल्या होत्या. त्यांना तिथे 32 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 10000 डॉलर मिळाले होते.