प्रेयसीचा ‘गर्भ’ भाडेतत्त्वावर देऊन संसार थाटण्याचे आमिष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 08:51 AM2021-10-17T08:51:18+5:302021-10-17T08:52:54+5:30
पैसे घेऊन पसार झालेल्या प्रियकराला अटक
मुंबई : एका बावीस वर्षीय तरुणीला तिचा गर्भ भाडेतत्त्वावर देत सरोगेट आई बनण्यास सांगत सुखी संसाराची स्वप्ने दाखवली, मात्र त्यासाठी ती तरुणी ‘अनफिट’ असल्याचे समजताच टोकन रक्कम घेऊन प्रियकर पसार झाला. याप्रकरणी मालाड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तरुणीची सुटका करत तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
तरुणी ही मालाडची राहणारी असून, इन्स्टाग्रामवर तिची मैत्री एका व्यक्तीशी झाली. तिने त्याला नोकरी शोधण्यास सांगितले तेव्हा नवी मुंबईत एका लॅबमध्ये त्याने तिला काम शोधून दिले. यादरम्यान त्या दोघांचे एकमेकांशी प्रेमसंबंध प्रस्थापित झाले आणि त्याने लग्नाच्या आमिषाने तिच्याशी शारीरिक संबंधही ठेवले. दरम्यान, लॅब बंद पडली आणि प्रियकराने पीडितेला हैदराबाद येथील जोडप्यासाठी सरोगेट आई बनण्यास तयार केले. तरुणीने घर सोडताना पुण्यात नोकरीच्या निमित्ताने जात असल्याचे सांगितले.
त्यानुसार सीएसएमटी स्टेशनवर दोघे पोहोचले आणि प्रियकराने पीडितेला हैदराबादला जाताना रेश्मा नामक महिलेसोबत राहण्यास सांगितले. रेश्माने तिला हैदराबादमध्ये एका रुग्णालयात नेले. दोन दिवस तिच्यावर विविध चाचण्या करण्यात आल्या, मात्र अहवालात ती सेरोगसीसाठी फिट नसल्याचे उघड होताच प्रियकर टोकन रक्कम घेऊन पसार झाला. त्यामुळे तिने आईला फोन करत पोलीस ठाण्यात धाव घेण्यास सांगितले.
आईने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार आधीच केल्याने मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने मुलीची सुटका करत १३ ऑक्टोबर रोजी प्रियकराला अटक केली.