वृद्ध महिलेचा गळा चिरुन खून करणाऱ्या एकाला घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 10:07 PM2021-10-09T22:07:42+5:302021-10-09T22:08:04+5:30
Crime News :आर्थिक विवंचनेतून खून केल्याची कबुली
लातूर / निलंगा : घरातील काम आवरुन शेताकडे निघालेल्या एका ७० वर्षीय महिलेचा गळा चिरुन खून केल्याची घटना ६ ऑक्टाेबरराेजी निलंगा तालुक्यातील गुराळ शिवारात घडली हाेती. दरम्यान, याप्रकरणी निलंगा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. पाेलीस पथकाने संदीप आनंदा भाेसले याला ताब्यात घेतले असून, आर्थिक विवंचनेतून खून केल्याची कबुली त्याने दिली.
पाेलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील गुराळ येथील शेषाबाई मारुती दूधभाते (७०) हे बुधवारी घरातील काम उरकल्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शेताकडे निघाल्या हाेत्या. दरम्यान, रस्ता निर्मनुष्य होता. यावेळी रस्त्यालगत दबा धरुन बसलेल्या एकाने त्यांचा गळा चिरुन खून करत गळ्यातील साेन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी निलंगा पाेलीस ठाण्यात मुलाच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. घटनास्थळी पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पाेलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पाेलीस अधिकारी डाॅ. दिनेशकुमार काेल्हे यांनी भेट देवून पाहणी केली. आराेपीच्या शाेधासाठी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ, स्थानिक गुन्हे शाखा आणि पाेलीस ठाण्यांची तीन पथके नियुक्त केली हाेती. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे संदीप आनंदा भाेसले याला ताब्यात घेवून अधिक चाैकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आर्थिक विवंचनेतून, पैशाची गरज असल्याने वृद्ध महिलेवर लक्ष ठेवत चाकूने गळा चिरुन खून केल्याचे त्याने सांगितले.
ही कारवाई पाेलीस निरीक्षक शेजाळ, सहायक पाेलीस निरीक्षक कुदळे, पाेलीस उपनिरीक्षक राठाेड, अक्कमवाड, मुळीक, गर्जे, महिला पाेलीस उपनिरीक्षक गायकवाड, अंमलदार शेंडगे, बानाटे, बेग, सूर्यवंशी, चव्हाण, मजगे, साेमवंशी, माने, मुळे, बेंबडे, नागमाेडे, काळे, भुतमपल्ले, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक सूधीर सूर्यवंशी, अंगद काेतवाड, राजू मस्के, माधव बिलापट्टे, नकूल पाटील यांच्या पथकाने केली.