एकतर्फी प्रेमातून महिलेवर प्राणघातक हल्ला करणारा गजाआड
By प्रशांत माने | Published: April 23, 2023 01:33 PM2023-04-23T13:33:23+5:302023-04-23T13:33:59+5:30
डोबिंवलीत १३ एप्रिलच्या मध्यरात्री घडली होती हल्ल्याची घटना
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: एकतर्फी प्रेमातून २५ वर्षीय महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या जिग्नेश जाधव या आरोपीला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे.
१३ एप्रिलच्या मध्यरात्री हल्ल्याची घटना डोंबिवली पुर्वेकडील शांतीनगर भागात घडली होती. जिग्नेश ने संबंधित महिलेला रस्त्यात थांबविले. तु मला आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करेन, तु माझ्याबरोबर ये असे म्हंटले. तीने त्यास नकार देताच जिग्नेश संतापला आणि त्याने तिच्या गळ्यावर चाकूने वार केला यात ती गंभीर जखमी झाली होती. तर आरोपीने तेथून पळ काढला होता.
याप्रकरणी आरोपी जिग्नेश विरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याला पकडण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांच्या मार्गदशनाखाली विशेष पथक नेमले गेले होते. दरम्यान आरोपी हा नाशिक येथे असल्याचे माहिती खबऱ्यामार्फत टिळकनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार आरोपी जिग्नेश ला सापळा लावून नाशिक येथून अटक केली. त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.