मंदिराजवळ नॉन व्हेज खातो म्हणून तरुणाला जिवे मारलं; तपासातून समोर आला भलताच प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 04:53 PM2021-07-04T16:53:52+5:302021-07-04T16:55:20+5:30
लष्कराचा जवान मुख्य आरोपी; तिन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक
गाझियाबाद: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. मंदिराजवळ मांसाहार करत असल्याच्या संशयातून तिघांनी २२ वर्षीय व्यक्तीला मारहाण केली. बेदम मारहाण झाल्यानं या व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
गाझियाबादमधील गंगानहार घाट परिसरात प्रवीण सैनी त्याच्या दोन मित्रांसह खाद्यपदार्थ खात होता. त्यावेळी दोन जण तिथे पोहोचले. त्यांनी प्रवीण आणि त्याच्या मित्रांशी वाद घातला. या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. या प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली. प्रवीण सैनी मंदिराजवळ मांसाहार करत नव्हता. तो मित्रांसोबत सोया चाप आणि चपाती खात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र आरोपींना तो मांसाहार करत असल्याचा संशय आला. त्यातूनच वादाला तोंड फुटलं आणि त्याचं पर्यावसान हाणामारीत झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
'आरोपी मद्यधुंद स्थितीत होते. प्रवीण आणि त्याच्या मित्रांना त्यांनी काठी आणि रॉडनं मारहाण करण्यास सुरुवात केली. मद्यधुंद अवस्थेत असल्यानं त्यांनी तिघांशी वाद घातला. आम्ही तिन्ही आरोपींना अटक केली आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे,' अशी माहिती सर्कल अधिकारी कमलेश नरेन पांडे यांनी दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपी नितीन लष्करात कार्यरत असून तो सध्या सुट्टीवर असल्याची माहिती चौकशीतून समोर आली.
नितीनसोबत असलेल्या त्याच्या दोन साथीदारांची ओळख पटली आहे. दोघेजण मंदिर परिसरात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत असल्याची माहिती पुढे आली आहे. प्रवीण आणि त्याच्या मित्रांना मारहाण केल्यानंतर तिघे घटनास्थळावरून स्कूटरनं फरार झाले. 'रेस्टॉरंटच्या बिलवरून प्रवीण आणि त्याचे मित्र सोया चाप खात असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेजदेखील हाती आलं आहे. मारहाण होण्याआधी दोन्ही गटांमध्ये अर्धा तास शाब्दिक बाचाबाची झाल्याचं फुटेजमध्ये दिसून आलं आहे,' अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.