पत्नीला खूश करण्याचा नाद भोवला, पठ्ठ्यानं १०० तोळ्याचा सुवर्ण हार बनवला;पोलिसांनी बोलावलं अन् डाव फसला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 04:29 PM2021-05-24T16:29:54+5:302021-05-24T16:31:00+5:30
या व्हिडीओत हा व्यक्ती पत्नीला लग्नाच्या वाढदिवसानमित्त १०० तोळ्याचा हार देताना दिसत आहे.
ठाणे – गेल्या काही वर्षात सोन्याच्या किंमती प्रचंड वाढत आहे. आज १ तोळा खरेदी करतानाही सर्वसामान्यांची पंचाईत होते. अशातच कोणी १०० तोळं सोन्याचा हार खरेदी केला आहे अशी बातमी तुम्ही ऐकली तर आश्चर्यचकीत व्हाल ना..भिवंडीतील कोनगाव येथे बाळा कोळी नावाच्या युवकानं लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीला १०० तोळे सोन्याचा हार दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या व्हिडीओत हा व्यक्ती पत्नीला लग्नाच्या वाढदिवसानमित्त १०० तोळ्याचा हार देताना दिसत आहे. गुडघ्यापर्यंत लांब असलेल्या सोन्याच्या हारानं सगळेच अचंबित झाले. हा सोन्याचा हार तब्बल १०० तोळ्याचा असल्याचा दावा युवकाने केला. सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ या युवकाला पोलीस ठाण्यात बोलावलं त्यानंतर या युवकाने जी माहिती दिली ती ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. हा हार सोन्याचा नाही तर नकली आहे असं युवकाने पोलिसांना सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी एका सराफा व्यवसायिकाकडून हा हार तपासून घेतला तेव्हा तो खोटा असल्याचं निष्पन्न झालं. मात्र सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या या व्हिडीओनं सगळ्यांचे डोळे अवाक् झाले. कोनगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी म्हणाले की, ज्वेलरी संदर्भात कोणतीही माहिती लोकांनी सोशल मीडियावर टाकू नये यामुळे चोरी होण्याची शक्यता असते. बाळा कोळीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस त्याच्या घरी गेली आणि त्याला पोलीस स्टेशनला आणलं. इतकी महाग वस्तू कुठून आणि कशी घेतली अशी विचारणा पोलिसांनी केली. हा हार तात्काळ बँकेत ठेवण्याची सूचना पोलिसांनी दिली. संबंधित व्यक्तीने तो हार खोटा असल्याची कबुली दिली असं पोलीस म्हणाले.
३८ हजार रुपयात खरेदी केला हार
सोन्यासारख्या दिसणाऱ्या या १०० तोळ्याच्या हाराची किंमत ३८ हजार रुपये आहे. बाळा कोळी यांनी कल्याणमधील एका ज्वेलरीच्या दुकानात तो खरेदी केला. पत्नीला खूश करण्यासाठी त्याने हा हार विकत घेतला. बाळाने सांगितली बाब खरी आहे की नाही हे पाहण्यासाठी पोलिसांनी या ज्वेलरी दुकानाशी संपर्क साधला तेव्हा तो हार नकली असल्याची पुष्टी त्यांनी दिली.