माझ्या अस्थी बँक लॉकरमध्ये ठेवा; सासरच्यांची बर्बादी बघायचीय! व्यवसायिकाचा अखेरचा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 04:54 PM2022-05-07T16:54:57+5:302022-05-07T16:55:12+5:30
माझ्या अस्थी विसर्जित करू नका, बँकेत लॉकरमध्ये ठेवा! आत्महत्या करण्यापूर्वी भावाला व्हॉट्स ऍपवर पाठवला व्हिडीओ
जमशेदपूर: झारखंडच्या जमशेदपूरमध्ये एका हॉटेलात व्यवसायिकानं आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यानं एक व्हिडीओ रेकॉर्ड केला. सासरच्या लोकांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यानं व्हिडीओमध्ये केला आहे. व्यवसायिक राहुल अग्रवाल यांनी गुरुवारी संध्याकाळी बिष्टूपूरमधल्या हॉटेलच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत जीव दिला.
राहुल अग्रवाल यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली. त्यांनी व्हिडीओ भावाला व्हॉट्स ऍप केला. सासरे, सासू, मेहुणा आणि पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं अग्रवाल यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं. अग्रवाल यांचे सासरे प्रदीप चुरीवाला शहरातील प्रख्यात बांधकाम व्यवसायिक आहेत. त्यांचाही उल्लेख अग्रवाल यांनी व्हिडीओत केला. 'प्रदिपचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत नाही, तोपर्यंत माझ्या अस्थी हरिद्वारमध्ये विसर्जित करू नका,' असं अग्रवाल यांनी म्हटलं.
'माझ्या अस्थी विसर्जित न करता त्या बँक लॉकरमध्ये ठेवा. मी तिथूनच सगळं बघेन. प्रदीप उद्ध्वस्त झाल्यावरच माझ्या अस्थींचं विसर्जन करा,' असं राहुल अग्रवाल यांनी त्यांच्या अखेरच्या व्हिडीओमध्ये म्हटलं. यात त्यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलांचादेखील उल्लेख केला. मी माझ्या पत्नी आणि मुलांवर खूप प्रेम करतो. माझी पत्नी तितकीशी वाईट नव्हती. पण तिच्या आईमुळे ती वाईट बनली, असं राहुल म्हणाले.
प्रदीप चुरीवाला पैसे देऊन काहीही करू शकतो. प्रदीप एका पैसेवाल्याशी त्याच्या मुलीचं लग्न लावून देऊ इच्छितो. त्यामुळे मला त्रास देत आहे, असा आरोप राहुल यांनी केला. त्यांनी व्हिडीओत आई, वडील आणि भावाची माफी मागितली आहे. माझ्यामुळे तुम्हाला कोर्टाच्या खेटा माराव्या लागू नयेत, असं राहुल यांनी शेवटी म्हटलं.