पत्नीने पाठवली घटस्फोटाची नोटीस, पतीने गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 02:12 PM2022-02-26T14:12:11+5:302022-02-26T14:12:38+5:30
Crime News : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मृताच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
फतेहाबाद : हरयाणातील फतेहाबाद येथे एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार लग्नापासूनच पती-पत्नीमध्ये मतभेद होते. त्यामुळे पत्नी तिच्या माहेरच्या घरी गेली आणि घटस्फोटाची नोटीस पाठवली. यामुळे दुखावलेल्या व्यक्तीने गळफास लावून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मृताच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना फतेहाबादच्या धनगड गावातील आहे. नागेश्वर (30) याचा लग्नापासून पत्नीसोबत वाद सुरू होता. अनेकवेळा दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला. मात्र काहीच झाले नाही. त्यामुळे नागेश्वरला चिंता वाटत होती. नागेश्वरने गुरुवारी रात्री घरातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. मृत नागेश्वरच्या खिशातून पोलिसांना सुसाइड नोट सापडली आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी सासरा जगदीश, मेव्हणा कुलदीप यांच्यासह सहा जणांना जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
याप्रकरणी डीएसपी अजयब सिंह यांनी सांगितले की, धनगड गावातील नागेश्वरने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. मृत नागेश्वरचे वडील हनुमान सिंह यांनी आपल्या मुलाचा सासरच्या लोकांकडून छळ होत असल्याची फिर्याद दिली आहे. त्यामुळे आरोपी सासरा, मेहुणा आणि इतर सहा जणांविरुद्ध 306 आणि 34 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.
मृत नागेश्वरचे वडील हनुमान सिंह यांनी सांगितले की, घटस्फोट प्रकरणाच्या सुनावणीबाबत गुरुवारी समन्स मिळाले होते. त्यानुसार 29 मार्च 2022 रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. गुरुवारी रात्री नागेश्वर हा घरात एकटाच असल्याने सकाळी त्याला चहासाठी बोलावण्यात आले. त्यामुळे त्याने फोन उचलला नाही, त्यानंतर खोलीचा दरवाजा आतून बंद होता. यानंतर व्हरांड्यात तो फासावर लटकलेला दिसला. त्यानंतर लगेच पोलिसांना कळवण्यात आले.