"बाबा, मला माफ करा, पत्नी मला मारते, तिला माझा..."; पतीचे गंभीर आरोप, उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:07 IST2025-01-28T13:05:41+5:302025-01-28T13:07:05+5:30
अतुल सुभाषच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला अशातच आता कर्नाटकात अशीच आणखी एक घटना समोर आली आहे.

फोटो - ndtv.in
अतुल सुभाषच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला अशातच आता कर्नाटकात अशीच आणखी एक घटना समोर आली आहे, ज्यामुळे कौटुंबिक नातेसंबंधांवर आणि छळाच्या गंभीर परिणामांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. एका ४० वर्षीय व्यक्तीने पत्नीच्या छळाला कंटाळून आपल्या घरात आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी चामुंडेश्वरी नगरमध्ये घडली.
एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या पेटारू गोल्लापल्ली यांनी त्यांच्या पत्नीवर छळाचा आरोप करणारी एक चिठ्ठी लिहिली. चौकशीत असं दिसून आलं आहे की, दोन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या या जोडप्यामध्ये लग्नानंतर तीन महिन्यांतच भांडायला सुरुवात केली, ज्यामुळे ते वेगळे राहू लागले आणि आता पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे आणि २० लाख रुपयांच्या पोटगीची मागणी केली आहे.
पेटारू गोल्लापल्ली यांचा भाऊ एशय्या म्हणाला की, रविवार असल्याने सर्वजण चर्चमध्ये गेले होते आणि दुपारी घरी परतल्यावर त्यांना त्यांचा भाऊ लटकलेला आढळला. त्या चिठ्ठीत, पेटारू यांनी त्यांच्या मृत्यूसाठी त्यांच्या पत्नीला जबाबदार धरलं आणि लिहिलं, "बाबा, मला माफ करा. माझी पत्नी मला मारत आहे. तिला माझा मृत्यू हवा आहे."
आपल्या भावाला न्याय देण्याची मागणी करताना एशय्या म्हणाले की, पेटारू एका खासगी कंपनीत काम करत होते. पण तीन महिन्यांपूर्वी त्यांची नोकरी गेली. आमच्या भावाला न्याय मिळायला हवा. त्या महिलेला अटक करायला हवी. माझ्या भावासारखा त्रास इतर कोणालाही सहन करावा लागू नये. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.