आयपीएलवरील सट्ट्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त; वडिलांची तीन मुलींसह विष खाऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 01:21 PM2019-05-09T13:21:14+5:302019-05-09T13:23:06+5:30
मुलींना जेवणातून विष देऊन स्वत:देखील केली आत्महत्या
वाराणसी: जुगारी वडिलांमुळे एक हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. सट्ट्यात सर्वकाही हरल्यानं एका पित्यानं तीन मुलींना विष देऊन स्वत:देखील आत्महत्या केली. आता या कुटुंबातील केवळ मुलींची आई जिवंत आहे. माहेरी गेल्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र पती आणि मुलींच्या मृत्यूमुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एकाच कुटुंबातल्या चौघांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
वाराणसीतल्या लक्सा भागात राहणारा दीपक कुमार कपडे विकण्याचं काम करायचा. त्याच्या कुटुंबात पत्नीसह निबिया (9), अद्वितीय (7) आणि रिया (5) असे चार सदस्य होते. दीपक आयपीएलच्या सामन्यांवरील सट्ट्यात सतत पैसे हरत होता. त्याची पत्नी माहेरी गेल्यानं तिला याबद्दलची कल्पना नव्हती. काकांनी त्यांच्या तीन मुलींना काहीतरी खायला दिल्याचं दीपक कुमार यांच्या पुतणीनं सांगितलं. 'काकांच्या तीन मुली अंगणात झोपल्या होत्या. काही वेळानं काका तिथे आले आणि त्यांना आत घेऊन गेले. त्यानंतर ते आजीच्या खोलीत जाऊन टीव्ही पाहू लागले. काही वेळानं त्यांची छोटी मुलगी रिया आजीजवळ गेली आणि वडिलांनी काहीतरी खायला दिल्याचं सांगू लागली. त्यावेळी काकांनी काहीतरी बहाणा सांगून शौचालयात गेले आणि त्यानंतर तिन्ही मुलींना उलट्या सुरू झाल्या,' असं दीपक यांची पुतणी साक्षीनं सांगितलं.
तीन मुलींसोबतच दीपक यांनादेखील उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना कबीरचौरा रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान चारही जणांचा मृत्यू झाला. दीपक आणि त्याच्या पत्नीमध्ये दररोज भांडणं व्हायची. त्यामुळेदेखील तो तणावाखाली होता, असं शेजारच्यांनी सांगितलं. आयपीएलवरील सट्ट्यात सतत हरल्यानं दीपक कर्जबाजारी झाला होता. दीपकनं मुलांच्या जेवणात विष कालवलं आणि स्वत:ही विष घेतलं, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.