पत्नीला बेशुद्ध करुन तिच्या तोंडात LPG गॅसचा पाइप कोंबला; खूनी पतीला पोलिसांनी शिताफीनं पकडला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 02:27 PM2021-09-06T14:27:49+5:302021-09-06T14:29:50+5:30
मुंब्राच्या जीवन बाग बुरहानी इमारतीत राहणाऱ्या शाहनवाज सैफी याने त्याची पत्नी सदफ सैफीची हत्या केली आणि त्यानंतर २ वर्षाच्या मुलीला घेऊन त्याने पळ काढला
इटारसी – मध्य प्रदेशाती इटारसी रेल्वे स्टेशनवर उभ्या असणाऱ्या एका ट्रेनमधून हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी मुंब्रा येथून पत्नीची हत्या करून स्वत:च्या मुलीला घेऊन फरार झाला होता. आरोपीचं मोबाईल लोकशेन ट्रेस करून पोलिसांनी या आरोपीला इटारसी रेल्वे स्टेशनवर उभ्या असणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनमधून शिताफीनं अटक केली.
मुंब्राच्या जीवन बाग बुरहानी इमारतीत राहणाऱ्या शाहनवाज सैफी याने त्याची पत्नी सदफ सैफीची हत्या केली आणि त्यानंतर २ वर्षाच्या मुलीला घेऊन त्याने पळ काढला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपी पतीचा मोबाईल ट्रेस केला. तेव्हा त्याचे लोकेशन मध्य प्रदेशातील इटारसी रेल्वे स्टेशननजीक आढळले. तेव्हा पोलिसांनी सापळा रचत आरोपीला त्या ट्रेनमधून अटक केली. मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड म्हणाले की, सदफ आणि शाहनवाज यांचा प्रेमविवाह झाला होता. परंतु मागील काही दिवसांपासून दोघा नवरा बायकोमध्ये भांडण सुरु होते. १ सप्टेंबर रोजीही या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर शाहनवाज सैफीने पत्नी सदफ सैफीला काही नशेची औषधं खायला दिली त्यानंतर तिची हत्या करुन फरार झाला.
स्वयंपाक घरातील गॅसचा पाइप तोंडात घातला
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, सदफ सैफी बेशुद्ध झाल्यानंतर तिच्या शरीराला शाहनवाजने अनेक ठिकाणी जाळले. त्यानंतर स्वयंपाक घरातील गॅसचा पाइप सदफच्या तोंडात घालून तो रुमच्या बाहेर आला. त्याने घराचा दरवाजा बंद करुन स्वत:च्या २ वर्षाच्या चिमुकलीला घेऊन शाहनवाजने तिथून पळ काढला. हत्येनंतर शाहनवाज त्याच्या मूळ गावी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे जाण्यासाठी एक्सप्रेस ट्रेन पकडून फरार होण्याचा प्रयत्न करत होता.
मुंब्रा पोलिसांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सदफ सैफीचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. त्यानंतर पती बेपत्ता असल्याचं कळालं. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी तातडीनं शाहनवाज सैफीचं मोबाईल लोकेशन ट्रेस केले. तेव्हा शाहनवाज मध्य प्रदेशातील इटारसी रेल्वे स्ठानकावर असल्याचं कळालं. त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी याची माहिती इटारसी आरपीएफ यांना दिली. त्यानंतर शाहनवाज सैफीला पोलिसांनी सापळा रचत अटक केली.