हृदयद्रावक! पत्नीला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यासाठी नव्हते पैसे, मुलाला विकलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 11:18 AM2024-09-08T11:18:17+5:302024-09-08T11:23:51+5:30
एका व्यक्तीला पत्नी आणि नवजात बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळवून देण्यासाठी आपल्या दोन वर्षांच्या मुलाला विकावं लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला पत्नी आणि नवजात बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळवून देण्यासाठी आपल्या दोन वर्षांच्या मुलाला विकावं लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी पैसे नव्हते. यामुळेच हॉस्पिटलमधील काही लोकांच्या सांगण्यावरून आपलं मूल एका जोडप्याला विकलं.
एका व्यक्तीने आपली पत्नी आणि नवजात मुलाला खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळवून देण्यासाठी आपल्या दोन वर्षांच्या मुलाला विकण्यास भाग पाडलं, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. ही घटना उघडकीस आल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट पसरली. याची माहिती मिळताच पोलीस व प्रशासनाने तात्काळ कारवाईत केली. पोलिसांनी शनिवारी पाच जणांना अटक केली असून मूल विकत घेणाऱ्या जोडप्याचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरवा पट्टी येथील रहिवासी हरीश पटेल हे आपल्या पत्नीला प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात घेऊन गेले होते. हे त्यांचं सहावं अपत्य होतं. बाळाच्या जन्मानंतर रुग्णालयाची फी भरण्यास असमर्थ असताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आई आणि नवजात बाळाला जाऊ दिलं नाही. पोलिसांनी सांगितलं की, हताश होऊन वडिलांनी शुक्रवारी आपल्या मुलाला खोट्या दत्तक कागदपत्रांखाली काही हजार रुपयांना विकण्याचं मान्य केलं.
पोलीस अधीक्षक संतोष कुमार मिश्रा यांनी सांगितलं की, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. या गुन्ह्यात सहभागी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मध्यस्थ अमरेश यादव, मूल खरेदी करणारा भोला यादव आणि त्याची पत्नी कलावती यादव, बनावट डॉक्टर तारा कुशवाह आणि रुग्णालयातील सहाय्यक सुगंती यांचा समावेश आहे.