दारूच्या नशेत इतका टल्ली झाला की, अनोळखी व्यक्तीला दिली कार अन् स्वत: मेट्रोने गेला घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 02:13 PM2023-06-14T14:13:38+5:302023-06-14T14:13:59+5:30
Crime News : जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, त्याच्यासोबत दारू पिणाऱ्या व्यक्तीने त्याला लुटलं. शेवटी तरूणाला ऑटो आणि नंतर मेट्रोने प्रवास करत दिल्लीतील घरी पोहोचावं लागलं.
Crime News : राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममधून एक अजब घटना समोर आली आहे. दिल्लीच्या ग्रेटर कैलाश-टू मध्ये राहणाऱ्या एका तरूणाला अनोळखी व्यक्तीसोबत दारू पिणं चांगलंच महागात पडलं. शुक्रवारी काम केल्यानंतर सायंकाळी कामाहून परत येत असताना तो गुरुग्राममध्ये दारू पिण्यासाठी गेला. पण जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, त्याच्यासोबत दारू पिणाऱ्या व्यक्तीने त्याला लुटलं. शेवटी तरूणाला ऑटो आणि नंतर मेट्रोने प्रवास करत दिल्लीतील घरी पोहोचावं लागलं.
दिल्लीच्या ग्रेटर कैलाश-टू मध्ये राहणारा अमित प्रकाश याने पोलिसांना आपल्या तक्रारीत सांगितलं की, तो गुरुग्रामच्या गोल्फ कोर्स रोड येथील एका कंपनीत काम करतो. तिथे त्याने ऑफिस संपल्यावर एका अनोळखी व्यक्तीसोबत दारू प्यायली होती. त्याच व्यक्तीच्या सांगण्यावरून तो सुभाष चौकात आपल्या कारमधून उतरला होता. नशेत असल्याने त्याला हे लक्षात राहिलं नाही की, ही त्याची स्वत:ची कार आहे. अमित प्रकाशनुसार तिथे उतरल्यानंर ऑटोने तो मेट्रो स्टेशनला गेला आणि मेट्रोने घरी पोहोचला. कारसोबत त्याचा लॅपटॉप, मोबाइल आणि 18 हजार रूपये कॅश गायब आहे.
पोलिसांनी अमित प्रकाशच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. प्रकाशने पोलिसांना सांगितलं की, तो दारू पिण्यासाठी अहातामध्ये गेला होता. अहाता गोल्फ कोर्स रोडवर लेकफॉरेस्ट वाइन शॉपजवळ आहे. नशेच्या स्थितीत एका वाइनसाठी मी 20 हजार रूपये दिले होते. पण ती बॉटल केवळ 2 हजार रूपयांची आहे. नंतर मालकाने मल 18 हजार रूपये परत केले. त्यानंतर कारमध्ये बसून मी दारू पित होतो. तेव्हाच एक अनोळखी व्यक्ती आली आणि सोबत बसून पिण्याचं बोलला. मी त्याला ऑफर केलं तर कारमध्ये बसला. मी त्याला काही ड्रिंक्स दिले.
प्रकाशने तक्रारीत सांगितलं की, त्यानंतर तो कार चालवत सुभाष चौकमध्ये पोहोचला. त्यानंतर अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कारमधून उतरला. मला आठवत नव्हतं की, ही माझीच कार आहे. त्यानंतर मी ऑटोने हुडा सिटी सेंटर पोहोचला. घरी पोहोचल्यावर मला माझ्यासोबत काय झालं हे समजलं. पोलीस म्हणाले की, पीडित तरूणाला त्या अनोळखी व्यक्तीबाबत फार जास्त काही आठवत नाहीये. आम्ही गुन्हा नोंदवून घेतला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्याचा शोध घेतला जात आहे.