बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी दागिने, पैसे घेऊन नववधू झाली पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 08:53 PM2022-09-30T20:53:50+5:302022-09-30T21:07:28+5:30
एक तरुणी फेसबुकवरून हरियाणातील एका तरुणाच्या प्रेमात पडली. यानंतर तिने मुलाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न करण्याचं ठरवलं
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिंदकी येथील एक तरुणी फेसबुकवरून हरियाणातील एका तरुणाच्या प्रेमात पडली. यानंतर तिने मुलाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न करण्याचं ठरवलं. त्यासाठी तिने तरुणाला बोलावून घेतलं. पण संधी साधून लग्नासाठीचे सोन्याचे दागिने आणि पैसे घेऊन ती पसार झाल्याची भयंकर घटना घडली आहे. यानंतर नवरदेवाने पोलीस ठाण्यात धाव घेतली असून मदतीची मागणी केली आहे.
पोलीस ठाण्याचे अधिकारी रवींद्र श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा शोध घेण्यात येत आहे. तिच्या मैत्रिणींसह दोघांची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती आवश्यक ती कारवाई केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, फतेहपूरच्या बिंदकी कोतवाली भागात राहणाऱ्या एका मुलीचे हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील सिटी पोलीस स्टेशन हद्दीतील जुंदला गेट परिसरात राहणाऱ्या प्रमोदसोबत प्रेमसंबंध होते. त्यानंतर तरुणीच्या सांगण्यावरून हा तरुण हरियाणातून बिंदकी येथील गांधी नगर येथे लग्नासाठी पोहोचला.
नवरदेवासोबत त्याचे काका पालराम, काकू प्रेमा देवी, आई, बहीण इनू होते. त्यानंतर वधूकडची काही मंडळीही एका खोलीत आली. दोघांनी एकमेकांना हार घालून लग्न केले. एकमेकांचे तोंडही गोड केले. हॉटेलमधून जाताना रस्त्यामध्ये नववधूने सांगितले की, तिला कपडे बदलून शाहबाजपूर बिंदकी येथील मंदिरात पाया पडण्यासाठी जायचे आहे. याच बहाण्याने नवरदेवाकडून 60 हजारांची रोख रक्कम, 15 हजार रुपये किमतीचे नवीन कपडे आणि दीड लाखांचे दागिने असा ऐवज घेऊन पळ काढला.
रात्री उशिरापर्यंत नवरदेवाने नववधूची वाट पाहिली, मात्र ती आली नाही, यावर मुलाकडच्या मंडळींनी नववधूच्या मैत्रिणी आणि तिच्या काकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. कोतवाली प्रभारी रवींद्र श्रीवास्तव यांनी सांगितले की, मुलीचा शोध घेण्यात येत असून अनेकांची याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. या घटनेने तरुणासह कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"