'काय हॉट दिसतेय, काय लुक देतेय'; शेरेबाजी करणाऱ्या विकृताला अटक, मुंबईतील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 09:50 AM2022-11-26T09:50:02+5:302022-11-26T14:44:24+5:30
गुन्हा दाखल झाल्यावर याप्रकरणी मालाड पोलिसांसह समतानगर सायबर पोलिसही तपास करत होते.
मुंबई : रस्त्यात चालणाऱ्या महिला व तरुणींचे फोटो काढत ते सोशल मीडियावर काय हॉट दिसतेय, काय लूक देतेय शेरेबाजी करत वायरल करण्याचा प्रकार मालाडमध्ये घडत होता. याप्रकरणी एका तरुणीने मालाड पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर उत्तर विभाग सायबर पोलिसांनी या विकृताला ताब्यात घेतले आहे.
अटक आरोपीचे नाव अमित भदोरिया असे (४३) आहे. भदोरिया याने २१ नोव्हेंबर रोजी मालाड परिसरात एक तरुणी तिच्या दुचाकीवरून जात असताना तिचा फोटो काढला. तेव्हा ती गाडीवरून खाली उतरली आणि तिने भदोरिया याला तिचा फोटो डिलीट करण्यास सांगितले. मात्र, भदोरिया उलट तिलाच धमकवू लागला. ही बाब सदर तरुणीने मालाड पोलीस ठाण्यात जाऊन सांगितली.
गुन्हा दाखल झाल्यावर याप्रकरणी मालाड पोलिसांसह समतानगर सायबर पोलिसही तपास करत होते. पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय चंदनशिवे, पोलिस निरीक्षक मंगेश देसाई, हवालदार सुहास नलावडे, पोलीस नाईक सोनाली दळवी, राहुल बोरसे यांनी तांत्रिक तपास करत अखेर भदोरिया याच्या मोबाइल लोकेशनवरून त्याचा ठावठिकाणा शोधून काढला आणि त्याला ताब्यात घेतले.