हनी ट्रॅप प्रकरण: व्हिडीओ कॉलवर त्या कपडे उतरवत आणि तो गोपनीय माहिती देई!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 06:37 AM2024-03-18T06:37:10+5:302024-03-18T06:37:47+5:30
पाकिस्तानी लष्कर तयार करत असे सुरक्षेचा नकाशा
जयपूर: राजस्थानच्या सीमेवर भारतीय लष्कराची कोणती तुकडी (युद्ध लढणारी किंवा सामान्य) तैनात आहे यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्था महिला एजंटच्या मदतीने शोध घेत होती, असे गुप्तचर विभागांच्या सूत्रांनी माहिती देताना सांगितले. सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था पाक लष्कराच्या हालचाली कशा असाव्यात हे ठरवते. हेरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा कशी असावी याचा नकाशा तयार केला जातो, अशी माहिती १५ मार्च रोजी श्रीगंगानगर जिल्ह्यातील सुरतगड आर्मी कॅन्टमध्ये पकडलेल्या आनंदराज याने दिली आहे.
काय मिळाली माहिती?
हेरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे महिला एजंटला भारतीय हद्दीत सीमेवर कोणत्या तुकड्या तैनात आहेत आणि भारतीय लष्कराची काय तयारी आहे याची ठोस माहिती मिळाली होती. गेल्या वीस दिवसांत बिकानेरच्या महाजन फील्ड फायरिंग रेंज आणि सुरतगड आर्मी कॅन्टची माहिती देणारे हेर पकडले गेले आहेत.
मोबाइलमध्ये महिला एजंटचे न्यूड व्हिडीओ
आनंदराज २ वर्षांपासून पाकच्या तीन महिला एजंटना भारतीय लष्कर आणि युद्ध क्षेत्राविषयी फोटो, व्हिडीओ आणि इतर माहिती देत होता. एजंटांच्या सांगण्यावरून त्याने त्यांना आर्मी कॅन्ट परिसरात दुचाकी दुरुस्ती करणाऱ्यांचे नंबरही दिले होते. व्हिडीओ कॉल दरम्यान महिला एजंट नग्न होत असत. आरोपी त्यांना रेकॉर्डही करत असे. आरोपीच्या मोबाइलमध्ये तिन्ही एजंटचे न्यूड व्हिडीओ सापडले आहेत. आरोपीने माहिती देण्याच्या बदल्यात पैशांची मागणीही सुरू केली होती.
लग्न करण्यासाठी बोलविले अन् पुन्हा माघारी पाठविले
- पाकिस्तानी महिला एजंट प्रिया अग्रवाल (टोपण नाव) हिने जयपूर आर्मी हॉस्पिटलमध्ये आर्मी ऑफिसर असल्याचे भासवून आरोपी आनंदराजशी संपर्क साधला. आरोपीला लग्न करण्यासाठी जयपूरला बोलावले होते. आरोपी आल्यावर त्याला नंतर ये असे सांगून माघारी पाठविले होते.
- पाक महिला एजंट अनिता (टोपणनाव) हिने फेब्रुवारीमध्ये बिकानेर आर्मी परिसरात कँटीन ऑपरेटर विक्रम सिंगला हनी ट्रॅप केले होते. अनिताच सुनीता बनून सूरतगडमधील ऑपरेटर आनंदराजच्या संपर्कात होती.
- पाक महिला एजंट पूजा (टोपणनाव) हिची आरोपी आनंदराजसोबत दुसरी एजंट प्रिया अग्रवालने ओळख करून दिली होती. पूजाने स्वतःला विद्यार्थिनी असल्याचे सांगितले होते. आरोपी आनंदराज हा तीन पाकिस्तानी महिला एजंटशी मोबाइलवर अश्लील बोलत असे.