पत्नीला त्याच्यासोबत पाहून भडकला पती; दोघांवर थेट बॉम्ब फेकले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 10:03 PM2020-02-03T22:03:31+5:302020-02-03T22:06:28+5:30

पत्नी आण तिचा मित्र हल्ल्यात जखमी; फरार पतीचा शोध सुरू

Man Hurls Crude Bombs at Wife and Her Friend in Ayodhya | पत्नीला त्याच्यासोबत पाहून भडकला पती; दोघांवर थेट बॉम्ब फेकले

पत्नीला त्याच्यासोबत पाहून भडकला पती; दोघांवर थेट बॉम्ब फेकले

Next

लखनऊ: पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून भडकलेल्या पतीनं दोघांवर क्रूड बॉम्ब फेकल्याची धक्कादायक घटना अयोध्येतल्या काशीराम वसाहतीत घडली. यानंतर पत्नी आणि तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीला श्रीराम रुग्णालयात नेण्यात आलं. बॉम्बफेक केल्यानंतर पती जालीम सिंह घटनास्थळावरुन फरार झाला. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शनिवारी रात्री हा प्रकार घडला. यानंतर परिसरात एकच खळबळ माजली. 

जालीम सिंह आणि त्याची पत्नी कोमल गेल्या सहा महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. कोमलचं मनोज नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय जालीमला होता, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं दिली. जालीमनं बॉम्ब फेकले, त्यावेळी मनोज कोमलसोबतच होता. शनिवारी रात्री जालीम सिंह कोमलच्या घराजवळ गेला. त्यावेळी त्याला मनोज आणि कोमल बोलताना दिसले. त्यावेळी जालीमनं दोघांच्या दिशेनं बॉम्ब फेकले. 

जालीम आणि कोमल यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झालं होतं. तेव्हापासूनच जालीम स्वत:सोबत क्रूड बॉम्ब घेऊन फिरत असावा, असा संशय पोलीस अधिकाऱ्यानं व्यक्त केला. घटनास्थळी पोलिसांना एक जिवंत बॉम्ब सापडला. तो निकामी करण्यात पोलिसांना यश आलं. 'मी कोमलला भेटण्यासाठी काशीराम वसाहतीत गेलो होतो. त्यावेळी जालीम सिंहनं माझ्या दिशेनं बॉम्ब फेकले. त्यानं पहिला बॉम्ब फेकला, त्यावेळी मी तिथून पळण्याचा प्रयत्न केला. त्यातून मी बचावलो. मात्र दुसऱ्या बॉम्ब हल्ल्यात मी जखमी झालो,' अशी माहिती मनोजनं माध्यमांना दिली.

जालीम सिंहनं चार ते पाच बॉम्ब फेकल्याचं कोमलनं सांगितलं. जालीमनं फेकलेल्या एका बॉम्बचा स्फोट माझ्या पायाजवळ झाला. जालीमच्या वर्तणुकीची तक्रार मी पोलिसांकडे आधीच केली होती. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, अशी माहिती तिनं दिली. जालीम सिंह मारहाण करत असल्यानं त्याच्यासोबत राहत नसल्याचं कोमलनं सांगितलं. 

आरोपी जालीम सिंहनं पत्नी आणि तिच्या मित्रावर क्रूड बॉम्बनं हल्ला केल्याची माहिती अयोध्या विभागाचे पोलीस अधिकारी अमर सिंह यांनी दिली. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच जालीम सिंहला पकडण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
 

Web Title: Man Hurls Crude Bombs at Wife and Her Friend in Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.