तरुण प्रेमात पडला, पण मुलीकडून प्रतिसाद नाही; लग्न करण्यासाठी प्रेमवीरानं केलं विचित्र कृत्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 02:56 PM2024-01-03T14:56:44+5:302024-01-03T15:00:20+5:30
तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरु केला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या.
Bihar Crime ( Marathi News ) : एकतर्फी प्रेमातून अनेकदा तरुणांकडून चुकीचं पाऊल उचलण्याच्या घटना घडतात. अशीच एक धक्कादायक घटना बिहारमधील मुंगेर इथं घडली आहे. एकतर्फी प्रेमानंतर तरुणीशी लग्न करण्यासाठी माथेफिरू तरुणाने थेट तरुणीच्या भावाचं अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रं फिरवत आरोपी तरुणाला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लडैयाटांड या गावातील तरुणाला गावातीलच एक तरुणी आवडत होती. मात्र तरुणीकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र तरीही सदर तरुणाला तिच्याशीच लग्न करायचं होतं. त्यामुळे त्याने चक्क तरुणीच्या भावाचं अपहरण केलं. आरोपी तरुणाला त्याच्या तब्बल आठ मित्रांनी अपहरणासाठी मदत केली होती. धनबाद येथून ट्रेनने घरी परत असताना हे अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर तुझ्या बहिणीला इथं बोलावलं तरंच मी तुला सोडेन, अशी धमकी आरोपीने दिली.
बहिणीला इकडे आणलं नाही तर हा तरुण माझी हत्या करेन, असं सदर तरुणीच्या भावाने फोनवरून कुटुंबीयांना सांगितलं.
दरम्यान, मुलाचं अपहरण झाल्याचं कळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने पोलीस आणि रेल्वे पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरु केला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपी आणि त्याच्या साथीदारांना अटक होताच सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.