सर्पदंशानं डुप्लिकेटला ठार मारलं, कोरोनामुळे दगावलेल्या भाच्याला 'जिवंत' केलं; पोलीस चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 09:15 AM2021-10-28T09:15:23+5:302021-10-28T09:16:07+5:30
विम्याच्या रकमेसाठी केलेलं प्लानिंग पाहून पोलीस चकीत
अहमदनगर: विम्याची रक्कम मिळवण्यासाठी एका व्यक्तीनं फिल्मी स्टाईल कहाणी रचली. अमेरिकेहून अहमदनगरला आलेल्या व्यक्तीनं स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला. मात्र पोलिसांनी त्यांच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरलं. स्वत:चा मृत्यू झालाय हे भासवण्यासाठी आरोपीनं त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या एका व्यक्तीची हत्यादेखील घडवून आणली. त्यानंतर एका मित्राच्या मदतीनं विम्याचे पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला.
'द सन'नं दिलेल्या वृत्तानुसार, अहमदनगर पोलिसांनी या प्रकरणात ५४ वर्षीय प्रभाकर भीमाजी वाघचौरे आणि त्याच्या ४ साथीदारांना अटक केली आहे. वाघचौरे गेल्या वर्षी अमेरिकेहून भारतात परतला होता. विम्याचे ५० लाख डॉलर मिळवण्यासाठी त्यानं स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला. त्यासाठी त्यानं हुबेहूब त्याच्यासारख्या दिसणाऱ्या एकाला शोधलं. त्याची सर्पदंशानं हत्या करून स्वत:चाच मृत्यू झाल्याचा बनाव वाघचौरेनं उभा केला.
वाघचौरेनं हत्या केलेल्या व्यक्तीचं नाव नवनाथ यशवंत आनाप असं आहे. नवनाथ बेघर होता. त्याचाच फायदा वाघचौरेनं घेतला. त्याला आमिष दाखवून वाघचौरेनं एका निर्जनस्थळी बोलावलं. तिथे कोब्राच्या दंशानं त्याला संपवलं आणि स्वत:चा मृत्यू झाल्याचं भासवलं. यानंतर प्रविण नावाची व्यक्ती वाघचौरेचा भाचा म्हणून तिथे पोहोचली. नवनाथचा मृतदेह आपल्याच मामाचा असल्याचा दावा प्रविणनं केला.
शवविच्छेदनानंतर नवनाथचा मृतदेह प्रविणनं ताब्यात घेतला. विमा कंपनीनं प्रविणकडे काही तपशील मागितले. वाघचौरेंच्या मृत्यूबद्दल चौकशी केली, तेव्हा त्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि काही महत्त्वाचे धागेदोरे त्यांच्या हाती लागले. त्यातून संशय वाढला.
सत्य शोधण्यासाठी पोलीस अहमदनगरच्या राजूरला पोहोचले. प्रविण स्वत:ला वाघचौरेचा भाचा म्हणवतो. मात्र प्रविणचा मृत्यू गेल्याच वर्षी कोरोनामुळे झाल्याचं तपासात समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी वाघचौरेची फोन रेकॉर्ड तपासले. त्यातून तो जिवंत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. सध्या सर्व आरोपी अटकेत आहेत. मुख्य आरोपी वाघचौरे २० वर्षे अमेरिकेत वास्तव्यास होता. गेल्याच वर्षी जानेवारीत तो मायदेशी परतला होता.