...अन् ७ वर्षाच्या मुलीने थेट पोलीस ठाणे गाठलं; घडलेला प्रकार ऐकून पोलीसही हादरले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 09:56 AM2020-06-05T09:56:46+5:302020-06-05T09:57:29+5:30
पोन्नरु सुभाषिनी ही महिला आपल्या तिसरा पती बुदबुक्कल स्वमुलु यांच्यासोबत या गावात राहत होती
नेल्लोर – आंध्र प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका व्यक्तीने आपल्या पत्नीशी भांडण झाल्यानंतर तिला जमिनीत जिवंत पुरल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेल्लोर जिल्ह्यातील गोतलपलेम या गावात पती-पत्नीमध्ये काही घरगुती कारणावरुन वाद झाला होता. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. पतीने पत्नीच्या डोक्यावर लाकडाने प्रहार केला. त्यानंतर ती बेशुध्द झाली.
पोन्नरु सुभाषिनी ही महिला आपल्या तिसरा पती बुदबुक्कल स्वमुलु यांच्यासोबत या गावात राहत होती. कोडावलुरु पोलीस निरीक्षक प्रताप यांनी सांगितले की, २७ मे रोजी रात्री पती-पत्नीने दोघांनी दारु प्यायली होती. यावेळी काही घरगुती कारणावरुन त्या दोघांमध्ये वाद झाला, हा वाद विकोपाला गेला असताना रागाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यावर दांडका मारला. त्यामुळे पत्नी सुभाषिनी बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली. पत्नीचा मृत्यू झाला असं स्वमुलुला वाटलं त्यामुळे त्याने जवळच्या एका ठिकाणी तिला जमिनीत जिवंत दफन केले.
स्वमुलुला वाटलं की हा प्रकार कोणीही पाहिला नाही, पण ही संपूर्ण घटना सुभाषिनीची ७ वर्षाची मुलीने पाहिली. जेव्हा सुभाषिनीला जमिनीत दफन केलं जात होतं त्यावेळी ती जिवंत होती, स्वमुलुने घडलेला प्रकार कोणालाही न सांगण्याची त्या ७ वर्षाच्या मुलीला धमकी दिली आणि तो तेथून फरार झाला. आईचा मृत्यू आणि फरार झालेला बाप यामुळे एकटी पडलेल्या त्या ७ वर्षाच्या मुलीने पोलीस ठाणे गाठले.
याठिकाणी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर पोलीसही हादरले, मुलीच्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सुभाषिनीचा मृतदेह बाहेर काढला, नेल्लोरच्या सरकारी रुग्णालयात तिच्या मृतदेहावर पोस्टमार्टम करण्यात येणार आहेत. सध्या पोलीस फरार आरोपी स्वमुलुचा शोध घेत आहेत. सुभाषिनीचा मृत्यू कधी झाला, कशामुळे झाला या सर्व प्रश्नांची उत्तरे पोस्टमार्टम रिपोर्टमधून उघड होतील. या प्रकरणी मुलीचा जबाब नोंदवून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणातील आरोपी स्वमुलुचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक बनवले आहे.