गर्लफ्रेंडची हत्या की ऑनर किलिंग, २ पिस्तुलीनं सस्पेन्स वाढला; हत्येचं गूढ कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 01:29 PM2023-04-08T13:29:23+5:302023-04-08T13:30:18+5:30
आता घरातून दोन पिस्तुल जप्त झाल्यानंतर आणखी सस्पेन्स वाढला आहे.
गाझियाबाद - उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये तरुणीच्या हत्येप्रकरणी आता नवा ट्विस्ट आला आहे. घरात दोन पिस्तुले मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा ऑनर किलिंगच्या अँगलने तपास सुरू केला आहे. मुलीच्या हत्येचा तपास सुरू आहे. नंदग्राम परिसरात २० वर्षीय प्रेयसीवर गोळ्या झाडल्याप्रकरणी सस्पेन्स वाढला आहे. गुरुवारी सकाळी ही बाब उघडकीस आली. युवकाने आधी प्रेयसीवर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. यानंतर त्याने स्वत: विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
लोकांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. आरोपी तरुणाला जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मुलाच्या मृत्यूनंतर आता या प्रकरणाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यात ऑनर किलिंगची चर्चाही जोर धरू लागली आहे. पोलिसांचा तपासही याच दिशेने जात असल्याचे दिसून येत आहे. ही घटना नंदग्राममधील घुकना परिसरात गुरुवारी सकाळी ८.३० वाजता घडली. M.com ची विद्यार्थिनी दीपमाला यादव घटनेच्या वेळी घरी एकटी होती. २६ वर्षीय राहुल चौधरीने घरात घुसून तिला गोळी झाडली असा आरोप आहे. मात्र या प्रकरणातील आरोपी राहुलचा दावा आहे की, गर्लफ्रेंडच्या घरच्यांनी त्याला बंदूक दिली होती. गोळी झाडल्यानंतर राहुलने लगेच विष प्राशन केले. शेजारचे आल्यावर त्याने स्वत:ला बाथरूममध्ये कोंडून घेतले. राहुलला पिस्तूल दीपमालाच्या भावांनी दिल्याचं म्हटलं जाते. याचाही तपास सुरू झाला आहे. आता घरातून दोन पिस्तुल जप्त झाल्यानंतर आणखी सस्पेन्स वाढला आहे.
दीपमाला खासगी विद्यापीठातून शिकत होती
दीपमाला गाझियाबादमधील एका खासगी विद्यापीठात एम.कॉमचे शिक्षण घेत होती. राहुल तिचा प्रियकर होता असं सांगितले जाते. कुटुंबातील सदस्य हनुमान जयंती पूजेसाठी मंदिरात जात असल्याचा फायदा घेत त्याने घरात प्रवेश केला. दीपमालाला गोळी मारली. जखमी दीपमालाचा रुग्णालयात जाण्यापूर्वीच मृत्यू झाला. दरम्यान, राहुलने विष प्राशन करून स्वत:ला बाथरूममध्ये कोंडून घेतले.
राहुलचा दिल्लीत मृत्यू
पोलीस पथक आणि स्थानिक लोकांच्या मदतीने राहुल चौधरी याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात ऑनर किलिंगच्या अँगलने तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जीटीबी रुग्णालयात उपचार घेत असताना राहुलने दीपमालाच्या कुटुंबातील कोणीतरी त्याला बंदूक दिल्याचे सांगितले होते, असा पोलिसांचा दावा आहे.
पोलिसांच्या हाती लागला व्हिडिओ
याप्रकरणी पोलिसांना एक व्हिडिओ हाती लागला आहे. यामध्ये राहुल घरातील वॉशरूममध्ये दिसत आहे. या क्लिपमध्ये राहुलचे पाय बांधलेले दिसत आहेत. त्याने विष प्यायल्याचे सांगितल्याचा दावा आहे.