आधी स्वत:च्या हाताची शीर कापली, मग चाकूनं मैत्रिणीचा गळा कापला; रेल्वे परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 03:44 PM2021-09-24T15:44:24+5:302021-09-24T15:54:42+5:30
तरुणानं केलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू; आरोपीला अटक
चेन्नई: एका तरुणानं २० वर्षीय तरुणीची चाकूनं वार करून हत्या केली आहे. तांबरम रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी ही घटना घडली. एम. श्वेता असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. ती मद्रास ख्रिश्चन कॉलेजची विद्यार्थिनी होती. तिच्यावर हल्ला करणारा तरुण नागापट्टीनमचा रहिवासी असून त्याचं नाव रामचंद्रन असं आहे.
श्वेताची हत्या केल्यावर रामचंद्रननं स्वत:ला संपवायचा प्रयत्न केला. पण त्यात तो अपयशी ठरला. मराईमलाई परिसरात असलेल्या एका कंपनीत रामचंद्रन काम करत होता. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्या प्रकृतीला आता कोणताही धोका नाही. श्वेता आणि रामचंद्रन एकमेकांना दोन वर्षांपासून ओळखत होते. गेल्या दोन महिन्यांपासून श्वेता रामचंद्रनला टाळत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
गुरुवारी श्वेता महाविद्यालयातून घरी परतत होती. घरी जाण्यासाठी ट्रेन पकडायला जात असताना रामचंद्रननं तिला गाठलं. त्यानं श्वेताला आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यानं स्वत:च्या हाताला इजा केली. मात्र यानंतरही श्वेता ऐकत नसल्याचं पाहून त्यानं तिच्यावर चाकूनं सपासप वार केले. शरीराच्या विविध अवयवांवर जखमा झाल्यानं श्वेता रक्ताच्या थारोळ्यात पडली. आसपास असलेल्या व्यक्तींनी रामचंद्रनला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. गंभीर जखमी झाल्यानं श्वेताचा जागीच मृत्यू झाला.