पोलिस तर कधी आर्मीत असल्याच्या थापा; दोन बायकांच्या नवरोबाने तिसरीशी बांधली लगीनगाठ!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 12:00 PM2023-03-14T12:00:41+5:302023-03-14T12:03:36+5:30
उमरेड ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल, आरोपीस अटक
उमरेड (नागपूर) : आधीच दोघींना जाळ्यात ओढत आणि त्यांना गोडीगुलाबीने फसवत त्यांच्याशी शुभमंगल उरकले. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. एवढ्यावरच हा तोतया नवरोबा थांबला नाही. त्याने चक्क तिसऱ्याच मुलीवर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रेमाचे जाळे फेकले. तिच्याशी लगीनगाठ बांधली. पूर्वीच्या दोन पत्नींपैकी एकीने फसवणुकीची ही बाब पीडित तिसऱ्या पत्नीच्या कुटुंबीयांकडे सांगितली. त्यानंतर या नाट्यमय, गंभीर गुन्ह्याचे बिंग फुटले. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी कुणाल उर्फ किरण महादेव शिंदे (२७, रा. हिवरा, जि. बीड) यास अटक केली आहे.
उमरेड येथील १९ वर्षीय फिर्यादी तरुणीच्या तक्रारीवरून उमरेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी किरण शिंदे याने जानेवारी २०२३ ला इन्स्टाग्रामवर पीडित तरुणीशी ओळख केली. मी पुणे आर्मी मेडिकल कोअर येथे क्लार्क पदावर असून, बक्कळ पगार असल्याचेही सांगितले. मी अनाथ आहे. अनाथालयात शिक्षण घेतले, अशीही थाप त्याने मारली. दोघांच्याही मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्याने लग्नाची मागणी घातली. पीडितेच्या कुटुंबीयांनी त्याला उमरेड येथे बोलावले.
२१ जानेवारी २०२३ ला साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, मी जयपूर येथे आर्मीत असून, आता पुण्याला रुजू होणार असल्याचे सांगत या तोतयाने पीडितेच्या घरीच मुक्काम ठोकला. १२ फेब्रुवारी २०२३ ला एका मंदिरात लग्नही उरकविले. त्यानंतर पीडितेच्या नातेवाइकांकडेसुद्धा पाहुणचारासाठी निघाला. दरम्यान, पूर्वीच्या दोन पत्नींपैकी एका पत्नीला आरोपी किरण शिंदे हा उमरेड येथे असल्याचे कळले. तिने पीडितेच्या कुटुंबीयांना संपूर्ण प्रकार सांगितला. काही लोकांनी नातेवाइकाकडे पाहुणचार करणाऱ्या या नवरोबाला उमरेडला आणले.
उमरेड पाेलिसांनी आराेपीला अटक करीत त्याच्याविरुद्ध भादंवि १७०, १७१, ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४६९, ४७१, ४९४, कलमांन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज, सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी किरण शिंदे यास १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दिनेश खोटोले करीत आहेत.
म्हणे चंदनाचे झाड!
किरण शिंदे नावाच्या या तोतया नवरोबाने पीडितेजवळ अनेक थापा मारल्या. पुणे येथे आर्मीत क्लार्क आहे. ६३ हजार रुपये वेतन मिळते. पुणे खडकवासला ५५ लाखांचा फ्लॅट आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे ५ एकर शेती असून, चंदन आणि सागवानाची झाडे आहेत, अशा अनेक थापा मारल्या. अनाथ असल्याचीही खोटी माहिती दिली.
अंबरनाथ येथे गुन्हा दाखल
आरोपी केदार शिंदे याच्याविरुद्ध याआधीच ठाणे शहर आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या अंबरनाथ शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस यंत्रणेत कर्तव्यावर असल्याच्या भूलथापा देत त्याने या परिसरात लगीनगाठ बांधली. कालांतराने फसवणुकीचा प्रकार उजेडात आला. पोलिस असल्याचे सांगत त्याने याठिकाणी एका तरुणीला फसविले. पोलिसाचे खोटे ओळखपत्रसुद्धा याप्रकरणी जप्त करण्यात आले होते.
बोगस कागदपत्रांचा आधार
फसवणुकीचा हा फंडा वापरताना आरोपी केदार शिंदे याने बोगस कागदपत्रांचा आधार घेतला. आर्मीचे खोटे अपाॅइंटमेंट लेटर आणि अन्य दस्ताऐवज पोलिसांनी जप्त केले आहेत.