तीन वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम आजोबास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 06:57 PM2021-06-09T18:57:04+5:302021-06-09T18:59:33+5:30
Crime News : तीन वर्ष सहा महिन्यांच्या नातीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आजोबास पोस्को कायद्याच्या विशेष न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
अकोला : सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जठारपेठ येथील रहिवासी असलेल्या तीन वर्ष सहा महिन्यांच्या नातीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आजोबास पोस्को कायद्याच्या विशेष न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावला असून दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांच्या कारावासाचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.
जठारपेठ येथील ४ वर्ष ६ महिन्याची पीडित मुलगी तिच्या आजी सोबत राहत होती. ११ नोव्हेंबर २०१८ रोजी तिची आजी कामानिमित्त बाहेर गेली असता ७२ वर्षीय नराधम आजोबाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर पीडितेची आजी घरी परतली असता तिला नात रडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आजीने तिला काबर रडत आहे अशी विचारणा केली असता नातीने लघवीच्या जागेवर प्रचंड वेदना होत असल्याची माहिती आजीला दिली. त्यानंतर आजीने आजूबाजूच्या महिलांनाही माहिती दिल्यानंतर मुलीवर तिच्या आजोबांनी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. दरम्यान आजीने या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी भातकुली तालुक्यातील आसरा येथील रहिवासी असलेल्या ७२ वर्षीय नराधम आजोबाविरूद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ (२) फ, तसेच पोस्को कायद्याच्या कलम ३, ४, ५ (एम) (एन),६ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रणिता कराळे व साहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल नांदे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. पॉस्को कायद्याचे विशेष न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाल्यानंतर त्यांच्या न्यायालयाने आरोपी आजोबास बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या सोबतच तीन लाख रुपये दंडही ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावासाची शिक्षचे प्रावधान न्यायालयाने केले आहे. तीन लाखाचा दंडांपैकी एक लाख ५० हजार रुपयांची रक्कम पीडितेला देण्याचाही आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने अड. मंगला पांडे यांनी कामकाज पाहिले.