मानसकन्येने प्रियकराच्या मदतीने केली पित्याची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 03:59 AM2019-12-08T03:59:59+5:302019-12-08T04:00:17+5:30
माहिम किनाऱ्यावरील सुटकेसमधील अवयव प्रकरण
मुंबई : निर्घृणपणे हत्या करून शरीराचे अवयव सुटकेसमध्ये भरून माहिम समुद्रकिनाºयावर फेकून देण्यात आले होते. या हत्येचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-५च्या पथकाला यश आले आहे. प्रेम प्रकरणाला विरोध करीत असल्याच्या कारणावरून मानलेल्या मुलीने सोळा वर्षांच्या प्रियकराच्या मदतीने ज्येष्ठ नागरिकाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार यातून उघडकीस आला आहे.
आराध्या जितेंद्र पाटील उर्फ रिया बेनेट रिबेलो (१९) हिने सोळा वर्षांच्या प्रियकरासमवेत बेनेट रिबेलो (वय ५९) यांना ठार मारून त्यांच्या शरीराचे निर्दयपणे तुकडे करून विविध ठिकाणी फेकून दिले. सुटकेसमध्ये मिळालेल्या शर्टाच्या कॉलरवरील टेलर मार्क व सोशल मीडियाच्या मदतीने कक्ष-५चे वरिष्ठ निरीक्षक जगदीश साईल व त्यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने तपास करून खुनाचा उलगडा अवघ्या पाच दिवसांत केला. हत्या केल्यानंतर तिने तीन दिवस मृतदेह घरात ठेवला. याच काळात दोघांनी मृतदेहाचे तुकडे करून निरनिराळ्या भागांत फेकून दिले, असे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. आराध्याला अटक करण्यात आली असून, त्याच्या प्रियकराची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
माहिममध्ये मगदुम शाह बाबा दर्गाच्या पिछाडीला असलेल्या समुद्रकिनाºयावर २ डिसेंबरला सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास एक सुटकेस आढळून आली होती. त्यामध्ये एक मानवी हात, पाय व गुप्तांग आणि दोन शर्ट, पँट व एक मरून रंगाचे स्वेटर होते. याबाबत माहिम पोलीस ठाण्यात दाखल करून मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. प्रकरण गंभीर असल्याने या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हा अन्वेषण शाखेकडून करण्यात आला. एका शर्टाच्या कॉलरवर ‘अल्मो मेन्स वेअर’हा टेलर मार्क होता, त्यावरून जगदीश साईल, निरीक्षक योगेश चव्हाण, सहायक निरीक्षक गणेश जाधव यांनी सहकाºयाच्या मदतीने या नावाच्या टेलरचा शोध घेतला असता, कुर्ल्यात बेलग्रामी रोडवरील गोल बिल्डिंगमध्ये अफरोज अन्सारी यांचे टेलरिंगचे दुकान असल्याचे समजले. त्यांच्याकडे शिलाई झालेल्या बिलाची कसून छाननी केली असता, त्यातून बेनेट या नावाच्या एका बिलाला जोडलेला कापडाचा तुकडा या शर्टाशी मॅच झाला.
सोशल मीडियावरून शोध घेतला असता, बेनेट रिबेलो यांचे नाव पुढे आले. त्यावरील मोबाइल नंबर बंद असल्याने, मृत व्यक्ती तोच असल्याच्या शक्यतेने पोलिसांनी त्यांच्या सांताक्रुझ (पूर्व) येथील वाकोला मशिदीशेजारील द्वारका कुंज, शॉप न. ५ येथे माहिती मिळविली. त्यात आठ-दहा दिवसांपासून ते दिसले नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. त्यांच्या घरात राहणारी मानसकन्या आराध्या व तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले असता, त्यांनी वडील रिबेलो हे कॅनडाला गेल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या सांगण्यात तफावत असल्याने कसून चौकशी केल्यावर त्यांनी कृत्याची कबुली दिली.
अत्यंत जटिल व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा तपास जगदीश साईल यांनी उपायुक्त शहाजी उमाप व सहायक आयुक्त नेताजी भोपळे यांच्या मागदर्शनाखाली केला. त्यांच्या पथकामध्ये निरीक्षक योगेश चव्हाण, सहायक निरीक्षक गणेश जाधव, सुरेखा जौंजाळ, महेंद्र पाटील, उपनिरीक्षक महेश बंडगर, संजय कदम, हवालदार रवींद्र राणे, मेहबूब शेख, अरविंद मालुसरे, विलास घागरे, सरफरोज मुल्लाणी, भावना पाटील आदींचा समावेश होता.
अशी केली हत्या
बेनेट रिबेलो यांना आराध्याच्या प्रेमाला विरोध होता, त्यामुळे त्यांच्यात वाद होत असे. यावरून दोघेजण वारंवार रिबेलो यांना शिवीगाळ व मारहाण करीत असत. २६ नोव्हेंबरला सायंकाळी दोघांनी घरात त्यांना बांबूने मारून चाकूने वार केले. गंभीर जखमी असूनही ते जिवंत असल्याने, बेनेट यांच्या तोंडात मच्छर मारण्याचे ब्लॅक हिट नावाचे औषधही फवारले. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आराध्याच्या प्रियकराने मोबाइलमध्ये मृतदेहाचे फोटो घेतले. त्यानंतर, धारदार सुरी गरम करून अवयवाचे तुकडे करून ते रोज एका बॅगेत भरून रिक्षातून नेऊन खाडीत ते टाकीत असत. तीन दिवसांत त्यांनी मृतदेहाचे एकूण सहा तुकडे करून सोयीनुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी टाकले.