मांडूळ विक्रीचा सौदा फिसकटला; मालेगावात गोळीबार करत खुनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 05:31 PM2023-03-15T17:31:56+5:302023-03-15T17:55:33+5:30
संशयितांनी सुमारे दोन लाख रुपये किमतीचे मांडूळ घेऊन पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे.
- शफीक शेख
मालेगाव (जि. नाशिक) : तालुक्यातील झोडगे शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावर शिवलिंग पेट्रोल पंपाजवळ मांडूळ विक्रीचा सौदा फिसकटल्याने बंदुकीतून गोळीबार करत खुनाचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि.१५) घडली आहे. संशयितांनी सुमारे दोन लाख रुपये किमतीचे मांडूळ घेऊन पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे.
पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून संशयित प्रमोद अहिरे (रा. हडसुने, ता. जि. धुळे), रामभाऊ (पूर्ण नाव माहीत नाही), शोएब (पूर्ण नाव माहीत नाही), सिराज शेख बशीर (२८, रा. अक्सा कॉलनी, मो. मन्सूर मो. बशीर शेख (१९, रा. अक्सा कॉलनी), सलमान ऊर्फ इमरान खान (२२, रा. बिस्मिल्लानगर) यांच्याविरोधात जबरी चोरी व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा तालुका पोलिसात दाखल केला आहे.
उमेश मधुकर जाधव (४२, रा. प्लॉट नं, ५१, कोरकेनगर, मालेगाव रोड, धुळे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सिराज, मन्सूर व सलमान या तिघांना अटक केली. संशयितांनी संगनमत करून जाधव यांचा विश्वास संपादन करून त्यांच्यासह साक्षीदार यांना मालेगाव येथे मांडूळ (दुतोंडी बिनविषारी साप) विक्री करण्यासाठी बोलावून घेतले. मात्र मांडूळ खरेदीचा सौदा काही जमला नाही.
त्यामुळे फिर्यादी व साक्षीदार हे धुळे येथे जात असताना त्यांना रस्त्यात अडवून त्यांच्या ताब्यातील मांडूळ व फिर्यादी जाधव यांचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला तसेच त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने बंदुकीने गोळीबार करून तेथून पलायन केले. २ लाख रुपये किमतीचे मांडूळ आणि २ हजारांचा मोबाईल जबरी चोरी करून पळून गेल्याने संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक स्वप्नील कोळी करीत आहेत.