मांडुळ सापाची तस्करी, मुक्ताईनगर येथील दोघे गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 08:14 PM2020-10-12T20:14:00+5:302020-10-12T20:16:37+5:30
Mandul Snake Smuggling : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अमरावती सेलची कारवाई
परतवाडा (अमरावती) : मांडुळ या सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पच्या अमरावती येथील सायबर क्राईम सेलने शनिवारी अकोट वन्यजीव विभाग अंतर्गत येणाऱ्या जळगाव येथे अटक केली. या घटनेने पुन्हा एकदा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात मांडुळ सापाची तस्करी प्रकरण उघडकीस आले आहे. शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता दोघांना अटक करण्यात आली. तर, जवळपास सात आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
अमोल महादेव हिवराळे (२८) व लक्ष्मण उर्फ सोनु राजु खिरोळकर (२२, दोघेही रा. वडोदा, ता. मुक्ताईनगर जि. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. १० आॅक्टोंबर रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावतीच्या सायबर क्राईम सेलला मौजा जळगावजवळील दोन व्यक्ती मांडूळ सापाची तस्करी करुन विक्रीची तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्प सायबर क्राईम सेलचे अधिकारी आणि अकोट वन्यजीव विभाग अकोटमधील अधिकाऱ्यांंनी सापळा रचला. हिवरखेड येथील एका पेट्रोल पंपाजवळ शनिवारी सायंकाळी आरोपी अमोल हिवराळे व लक्ष्मण (सोनु) राजु खिरोळकर यांना अटक करण्यात आली. त्यांचेकडून मांडुळ या प्रजातीचा साप आणि तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणात आणखी नऊ लोकांचा सहभाग असल्याचे दिसुन आलेले आहे. अटक आरोपीस १३ आॅक्टोबरपर्यंत वनकोठडी मिळालेली आहे.
सदर प्रकरणाचा तपास हिवरखेड फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण हे करत आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्यवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक एम. एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनात अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर, विभागीय वनाधिकारी मनोज खैरनार, सहाय्यक वनसंरक्षक लक्ष्मण आवारे, अकोटचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण पाटील यांच्यासह वनरक्षक आकाश सारडा आर.जे. आडे, आर. आर. ठवकर, बळीराम सरकटे, अतीफ हुसेन, एन.बी.अंभोरे या पथकाने ही कारवाई केली.