मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 11:18 IST2025-04-21T11:17:21+5:302025-04-21T11:18:17+5:30
हॉस्पिटलची प्रशासन अधिकारी मनीषा माने-मुसळे हिच्या अटकेची बातमी आली. त्यानंतर तिला ओळखणाऱ्या मंडळींनी मनीषाबद्दल सांगायला सुरुवात केली.

मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
सोलापूर - विख्यात मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मनीषा माने-मुसळे हिला अटक झाल्यानंतर वळसंगकर हॉस्पिटलमध्ये प्रशासन अधिकारी असलेल्या मनीषा माने-मुसळे हिची कौटुंबिक पार्श्वभूमी अन् राहणीमानाबद्दल शहरात चर्चा सुरू आहे. मनीषा डॉ. वळसंगकरांच्या रुग्णालयात कामाला लागली अन् काही दिवसांतच घरची मेंबर झाली. मग बघता बघता ती एकदम वरिष्ठ अधिकारीही झाली, असे सांगण्यात येत आहे.
डॉ. वळसंगकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये ए. ओ. माने-मुसळे हिच्यामुळेच आत्महत्या करीत असल्याचे नमूद केल्यानंतर तशी फिर्याद डॉक्टरांचे चिरंजीव डॉ. अश्विन यांनी दिली. पोलिसांनी तिला शनिवारी रात्री उशिरा अटक केली. मनाने स्थिर अन् कुशाग्र बुद्धीच्या डॉक्टरांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले असेल? याबद्दल चर्चा सुरू असतानाच हॉस्पिटलची प्रशासन अधिकारी मनीषा माने-मुसळे हिच्या अटकेची बातमी आली. त्यानंतर तिला ओळखणाऱ्या मंडळींनी मनीषाबद्दल सांगायला सुरुवात केली.
मरीआई चौकातील गवळी वस्ती येथे तिचे माहेर आहे. शिकताना तिने हॉस्पिटलमध्ये काम सुरू केले. कामातूनच तिने डॉ. वळसंगकर कुटुंबावर प्रभाव पाडला. तिकडे रुग्णालयातही तिला बढती मिळाली अन् तिचा रुबाब वाढल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी तिला कन्याच मानल्याचे बोलले जात आहे.
डॉक्टरांच्या अंत्ययात्रेत सहभागी
मनीषा माने-मुसळे हिला डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी अटक केल्यानंतर ती डॉक्टरांच्या अंत्ययात्रेत होती का, याचीही चर्चा सुरू असून, काही माहितगारांनी सांगितले की, मनीषा ही डॉक्टरांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी रडत-रडतच आली होती. हे अनेकांनी पाहिले आहे. शिवाय तिचा अंत्ययात्रेत रडत जातानाचा फोटोही व्हायरल झाला आहे.
एकीकडे दुःख... दुसरीकडे तातडीची सेवा
कितीही संकटे आली तरीही रुग्णसेवा सुरूच असते. डॉक्टरांचे ते कर्तव्य असून ते नेहमीच याला जागतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे वळसंगकर हॉस्पिटल. ज्या रुग्णालयाला डॉ. शिरीष वळसंगकर यांनी उभे केले. त्यांचे निधन झाले असतानाही रुग्णालयात तातडीची सेवा सुरू होती, तर ओपीडी सोमवार २१ एप्रिलपासून सुरू होणार आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांचे निधन झाल्यानंतर १८ एप्रिल रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या दिवशी ओपीडी पूर्णपणे बंद करण्यात आली होती, तर तातडीची सेवा सुरू होती. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने ओपीडी बंद होती.