मांजाने महिलेची हनुवटी चिरली; वाहतूक पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल, अधिक तपास सुरू
By गौरी टेंबकर | Published: January 16, 2024 11:16 AM2024-01-16T11:16:54+5:302024-01-16T11:17:50+5:30
जखमी झालेल्या शिल्पा महाडिक जोगेश्वरीवरून त्यांच्या आईला भेटण्यासाठी जात होत्या
गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सोमवारी एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची हनुवटी पतंगाच्या मांज्यामुळे चिरली गेली. त्यांना वाहतूक पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आणि या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. जखमी तक्रारदार शिल्पा महाडिक (३९) या ऍक्टिव्हा मोपेड चालवीत जोगेश्वरीवरून त्यांच्या आईला भेटण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्गे निघाल्या होत्या. त्या सहारा स्टारब्रिजवर दुपारी ३ वाजता त्या पोहोचल्या.
त्यावेळी अचानक समोर आलेल्या पतंगाच्या मांजाने त्यांची हनुवटी चिरली जाऊन त्यांना गंभीर दुखापत झाली. त्या रडत ब्रिज खाली आल्या आणि त्यांनी याबाबत वाहतूक पोलिसांना कळवले. त्याना तात्काळ वाकोला वाहतूक पोलिसांनी स्टाफच्या सहाय्याने व्ही.एन देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचार करून त्याना त्यांच्या वडिलांसोबत सांताक्रुझच्या सरला हॉस्पिटल याठिकाणी हलवण्यात आले. फार्मा कंपनीत काम करणाऱ्या महाडिक यांनी गाडी चालविताना हेल्मेट परिधान केले होते. या घटने नंतर मांजा बॅन करण्यात यावा अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.