Mansukh Hiren: ११ मिनिटे संभाषण, कॉलमागे सचिन वाझे कनेक्शन; गायमुख परिसरात मनसुख यांची हत्या केल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 03:18 AM2021-03-27T03:18:37+5:302021-03-27T06:16:20+5:30
एनआयएच्या तपासानुसार, ४ मार्चला मनसुख यांना कॉल करून बोलावून घेतले. पुढे सचिन वाझे आणि त्याच्यासोबत असलेल्या अन्य साथीदार मनसुखसोबत निघाले.
मुंबई : मनसुख हिरन यांची ठाण्याच्या गायमुख परिसरात हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह रेती बंदर येथील खाडीत फेकण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. यात, ठाणे येथील प्रभारी वरिष्ठ निरिक्षकाने त्यांना रेती बंदर परिसरात आणण्यास मदत केल्याचा संशय एनआयएला असून, त्या दिशेने तपास सुरू आहे.
एनआयएच्या तपासानुसार, ४ मार्चला मनसुख यांना कॉल करून बोलावून घेतले. पुढे सचिन वाझे आणि त्याच्यासोबत असलेल्या अन्य साथीदार मनसुखसोबत निघाले. गायमुख येथे बराच वेळ त्यांचे वाहन थांबले होते. याच ठिकाणी त्यांची हत्या केल्याचा संशय एनआयएला आहे. तेथून त्यांचा मृतदेह रेतीबंदरच्या दिशेने नेला. यात, वाटेत कोणी अडवू नये म्हणून ठाण्यातील एक वरिष्ठ निरीक्षकही वाहनात उपस्थित होते. या अधिकाऱ्यालाही यात अटक होण्याची शक्यता आहे.
काम झाल्यावर वाझे रात्री साडेदहाच्या सुमारास ते ठाण्याहून फ्री वेवरून मुंबईत पोहोचले. फ्री वे उतरल्यावर सर्वांत जवळचे पोलीस ठाणे हे डोंगरी असल्याने त्यांनी बारवर कारवाई दाखविण्यासाठी हे पोलीस ठाणे निवडले होते. येथील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
सिमकार्डही केले नष्ट
यातील अन्य साथीदारांनी दोन वेगवगेळ्या ठिकाणी सिमकार्डही नष्ट केले. त्यामुळे मनसुख यांचे दोन लोकेशन दाखविले होते.
डान्सबार मालकाकडे चौकशी
३ मार्च रोजी एक डान्स बार मालक आपल्या मर्सिडीजमधून पोलीस आयुक्त कार्यालयात आला होता. जवळपास चार ते पाच तास तो सीआययूच्या कार्यालयात उपस्थित होता. तेव्हा वाझे, विनायक शिंदेसह गुन्हे शाखेतील एक प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकही तेथे हजर होता. त्यामुळे ही मंडळी येथे काय करत होती, तो डान्स बारमालक तेथे का आला? यासाठी त्यालाही गुरुवारी चौकशीसाठी बोलाविण्यात आल्याची माहिती समजते आहे.
११ मिनिटे संभाषण... कॉलमागे वाझे कनेक्शन
४ मार्चच्या रात्री मनसुख हे तावडे नावाच्या अधिकाऱ्याला भेटायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले. त्या व्यक्तीसोबत मनसुख यांचे ११ मिनिटे संभाषण झाल्याचे समोर आले. तो व्यक्ती मनसुख यांच्या ओळखीचा असल्याशिवाय ते त्याच्याशी एवढा वेळ बोलणे शक्य नसल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.