Mansukh Hiren Case : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचा खरा मालक कुणी वेगळाच!

By पूनम अपराज | Published: March 9, 2021 07:09 PM2021-03-09T19:09:51+5:302021-03-09T19:11:09+5:30

Mansukh Hiren Death Controversy: विमला यांनी जबाबात नोव्हेंबर २०२० ते ६ मार्चपर्यंतचा घटनाक्रम उलगडला आहे.

Mansukh Hiren Case : Real owner of the Scorpio found outside Mukesh Ambani's house is different! | Mansukh Hiren Case : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचा खरा मालक कुणी वेगळाच!

Mansukh Hiren Case : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचा खरा मालक कुणी वेगळाच!

googlenewsNext
ठळक मुद्दे२ मार्चला सायंकाळी दुकानातून मनसुख घरी आले आणि सांगितले सचिन वाझेसोबत मुंबईत गेले होते आणि त्यांच्या सांगण्यावरून ऍडव्होकेट गिरी यांच्याकडून वारंवार पोलिसांकडून आणि  मीडियाकडून फोन येत असल्याने त्रास होत असल्याची लेखी तक्रार मुख्यमंत्री, ठाणे आणि मुंबई पो

ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा मुंब्रा रेतीबंदर खाडीत ५ मार्चला मृतदेह सापडल्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात ५ मार्चला अपमृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान २५ फेब्रुवारीला प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारप्रकरणी मनसुख यांची मुंबई क्राईम ब्रँच आणि एटीएस चौकशी करत होते. मात्र चौकशीदरम्यान मनसुख यांचा मृतदेह सापडल्याने गृहमंत्र्यांनी याबाबत तपास मुंबई पोलिसांकडे न देता एटीएसकडे दिला. याप्रकरणी हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एटीएसने ७ मार्चला रीतसर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. विमला यांनी एटीएसने दिलेल्या आपल्या जबाबात अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. विमला यांनी जबाबात नोव्हेंबर २०२० ते ६ मार्च पर्यंतचा घटनाक्रम उलगडला आहे. या जबाबातून मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळलेल्या स्कॉर्पिओ कारचा खरा मालक डॉ. पिटर न्यूटन असल्याचं समोर येत आहे. 

 

एटीएसने विमला यांच्या नोंदवलेल्या जबाबात असे नमूद करण्यात आले आहे की, विमला आणि मनसुख यांना मीत (२०), वंश (१३) आणि लकी (१९) ही तीन मुलं असून मनसुख यांचे क्लासिक कार डेकोर नावाचे ठाण्यात ऑटोमोबाईल ऍक्सेसरीज विक्रीचा व्यवसाय आहे. आमच्या व्यवसायातील ग्राहक डॉ. पिटर न्यूटन यांच्या मालकीची महिंद्रा स्कॉर्पिओ कर क्रमांक एमएच ०२/एवाय २८१५ हि गेल्या ३ वर्षांपासून त्यांच्या संमतीने आमच्या ताब्यात होती. वाहनाचा वापर आम्ही कुटुंबीय करत होतो. आमच्या व्यवसायाच्या निमित्ताने ग्राहक असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे माझ्या पतीच्या परिचयाचे होते. 

 

वाझे यांना माझे पती मनसुख यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये स्कॉर्पिओ कार वापरण्यासाठी दिली होती. ही स्कॉर्पिओ कार वाझे यांनी ५ फेब्रुवारीला त्यांच्या चालकामार्फत माझ्या पतीकडे दुकानावर पाठवून दिली. त्यावेळी स्कॉर्पिओचे स्टेअरिंग हार्ड वाटत असल्याचे मनसुख यांनी मला सांगितले होते. मनसुख १७ फेब्रुवारीला सायंकाळी ६. ३० वाजताच्या सुमारास ठाणे येथील दुकानातून व्यवसायानिमित्त स्कॉर्पिओमधून एकटेच मुंबईला जाण्यासाठी निघाले. मात्र, मुलुंड टोल नका क्रॉस करून पुढे गेल्यानंतर कारचे स्टेअरिंग हार्ड वाटत असल्याने मनसुख यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला पार्क केली. त्यांनतर ओला / उबर कारने पुढे मुंबईला गेले होते. त्यानंतर १८ फेब्रुवारीला दुकानातील कर्मचाऱ्याला सोबत घेऊन स्कॉर्पिओ दुरुस्त करण्यासाठी म्हणून पार्क केलेल्या ठिकाणी गेले असता कार त्या ठिकाणी दिसली नाही. ही बाब मनसुख यांनी पत्नी विमला यांना १८ फेब्रुवारीला सांगितली. नंतर कार हरवल्याबाबत मनसुख यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

 

२५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया या निवासस्थानाबाहेर एक स्कॉर्पिओ स्फोटकांसह आढळली. ही बातमी मी टीव्हीवर पहिली. मात्र, ती आमची चोरीला गेलेली गाडी आहे कि नाही याबाबत गाडीचा क्रमांक वेगळा असल्याने खातरजमा झाली नव्हती. नंतर एटीएस आणि मुंबई गुन्हे शाखेकडून कॉल येण्यास सुरुवात झाली. २६ फेब्रुवारी सकाळी सीआययूचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासोबत मनसुख मुंबई गुन्हे शाखेत गेले होते. त्यानंतर तरी १०. ३० वाजताच्या सुमारास ते घरी पार्ट सचिन वाझेंसोबत आले. २७ फेब्रुवारीला पुन्हा सकाळी मनसुख वाझेंसोबत गेले आणि रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घरी आले होते. नंतर २८ फेब्रुवारीला सुद्धा वाझेंसोबत मनसुख गेले. त्यांचा जबाब नोंद करण्यात आला. जबाबची प्रत मनसुख यांनी घरी आणून ठेवली होती. त्यावर सचिन वाझे यांचे नाव आणि सही आहे. 

 

१ मार्चला पतीला भायखळा पोलिसांकडून फोन आला आणि चौकशीसाठी बोलवले असल्याचे मला सांगितले. मात्र, त्यादिवशी ते कोठे गेले नाहीत, ते त्यादिवशी घरीच होते. २ मार्चला सायंकाळी दुकानातून मनसुख घरी आले आणि सांगितले सचिन वाझेसोबत मुंबईत गेले होते आणि त्यांच्या सांगण्यावरून ऍडव्होकेट गिरी यांच्याकडून वारंवार पोलिसांकडून आणि  मीडियाकडून फोन येत असल्याने त्रास होत असल्याची लेखी तक्रार मुख्यमंत्री, ठाणे आणि मुंबई पोलीस आयुक्तांना  दिली. ३ मार्चला सकाळी नेहमीप्रमाणे मनसुख दुकानात गेले आणि रात्री दुकानातून ९ वाजताच्या सुमारास आले.  त्यावेळी रात्री मला माझे पती यांनी सांगितले की, सचिन वाजे बोलत आहे की, तू या केसमध्ये अटक हो, दोन - तीन दिवसात मी तुला जामिनावर बाहेर काढतो, मी त्यावेळी हिरेन यांना सांगितले, तुम्ही अटक होण्याचो काही गरज नाही. आपण कोणाकडे तरी सल्लामसलत करून निर्णय घेऊ. त्यावेळी हिरेन थोडे टेन्शनमध्ये असल्याचे वाटत होते. 

  

४ मार्चला माझे पती हिरेन यांनी सकाळी माझ्या मोबाईलवरून माझे दीर विनोद  यांची पत्नी सुनीता यांच्या फोनवर फोन करून कदाचित मला अटक होईल, तरी तू माझ्यासाठी चांगल्या वकीलांशी माझा अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी बोलणी करून ठेव असे सांगून ते दुकानात निघून गेले होते, असे विमला यांनी आपल्या जबाबात एटीएसला माहिती दिली आहे. ४ मार्चला सायंकाळी मनसुख यांच्यासाठी घरामधून जेवणाचा डबा घेऊन माझा मोठा मुलगा मीत हा दुकानात गेला. साधारण  रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मनसुख यांचे मला मिस कॉल आले. विमला यांनी  त्यांना फोन केला असता ते लिफ्टमधून घरी येत होते. त्यावर विमला यांनी एवढ्या लवकर कसे आलात? अशी विचारणा केली असता त्यावर मनसुख यांनी बाहेर जायचे सांगितले. मनसुख यांनी कांदिवलीहून पोलीस अधिकारी तावडे यांचा फोन आला होता, त्यांना मी भेटायला घोडबंदरला जात असल्याचे पत्नीस सांगितले.  रिक्षाने मनसुख गेले. ९.३० वाजता माझा मुलगा मीत हा दुकानातून घरी आला आणि त्याने विमला यांनयांना डॅडी अजून आले नाहीत का? त्यादिवशी रात्री ११ पर्यंत मनसुख घरी न आल्याने वाट पाहून मोबाईलवर कॉल केला. मात्र, फोन स्विच ऑफ येत असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही. नंतर ५ मार्चला नौपाडा पोलीस ठाण्यात मुलगा मीत आणि मनसुख यांचे भाऊ विनोद यांनी मिसिंगची तक्रार दिली. दुपारी ३.३० वाजता मनसुख यांचा मृतदेह मिळाल्याची माहिती मीतने आई विमलाला दिली. असा एकूण घटनाक्रम विमला यांनी आपल्या जबाबात सांगितला आहे. 

Web Title: Mansukh Hiren Case : Real owner of the Scorpio found outside Mukesh Ambani's house is different!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.