Mansukh Hiren Case : क्रिकेट बुकीने सचिन वाझे यांना मिळवून दिले होते सिमकार्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 06:21 PM2021-03-21T18:21:28+5:302021-03-21T18:33:19+5:30
Mansukh Hiren Case : क्रिकेट बुकी असलेल्या गोरने गुन्ह्यासाठी ५ बेनामी सिमकार्ड मुख्य आरोपी सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांना उपलब्ध करून दिले असल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे.
एकीकडे राज्यात सचिन वाझेंना (Sachin Vaze) महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचा गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांनी आदेश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Param Bir Singh) यांनी केल्याने खळबळ उडालेली असताना दुसरीकडे मनसुख हिरेन प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलेला पोलीस विनायक शिंदे (५१) आणि बुकी असलेला नरेश गोर (३१) याला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. क्रिकेट बुकी असलेल्या गोरने गुन्ह्यासाठी ५ बेनामी सिमकार्ड मुख्य आरोपी सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांना उपलब्ध करून दिले असल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे.
मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपींना अटक केल्यानंतर ठाण्यातील शिवाजी महाराज रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना ठाण्यातील एटीएसच्या कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले. एटीएसचे पोलीस महासंचालक जगजित सिंग यांच्यासह अनेक वरीष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली pic.twitter.com/af8fO2Y1Hc
— Lokmat (@MiLOKMAT) March 21, 2021
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया इमारतीनजीक जिलेटीन कांड्यासह स्कॉर्पिओ कार आढळली. त्यानंतर तपासादरम्यान स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा अचानक मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत ५ मार्चला मृतदेह आढळला. या मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा महाराष्ट्र एटीएस तपास करत आहे. खात्रीलायक माहितीवरून एटीएसने पळत ठेवून नरेश रामणीकलाल गोर आणि विनायक बाळासाहेब शिंदे यांना अटक केली. आरोपी विनायक शिंदे हा निलंबित पोलीस कर्मचारी असून त्याला २००७ साली वर्सोवा येथे लखनभैय्या कथित चकमक प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. मी २०२० पासून शिंदे पॅरोलवर आहे. रजेवर आल्यानंतर ते या गुन्ह्यातील आरोपी सचिन वाझे यांच्या संपर्कात असून त्यांच्या बेकायदेशीर कामांत त्यांना सहकार्य करायचा. मनसुख कटात आणखी कोण सहभागी आहेत. तसेच कटाचे मुख्य सूत्रधार कोण आहेत याबाबत एटीएस सखोल तपास करत आहे. अटक दोन्ही आरोपींना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी कोर्टाने सुनावली आहे.