Mansukh Hiren Death: मनसुख हिरेन यांची हत्या व्होल्वो गाडीतच? सचिन वाझे ATS जबाबात खोटं बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 05:25 AM2021-03-24T05:25:43+5:302021-03-24T05:26:06+5:30

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण; ‘ते’ सिम कार्ड गुजरातच्या कंपनीच्या नावे, वाझेने एटीएसला खोटा जबाब दिल्याचे उघडकीस

Mansukh Hiren Death: Mansukh Hiren killed in a Volvo car? Sachin Waze lied in reply to ATS | Mansukh Hiren Death: मनसुख हिरेन यांची हत्या व्होल्वो गाडीतच? सचिन वाझे ATS जबाबात खोटं बोलले

Mansukh Hiren Death: मनसुख हिरेन यांची हत्या व्होल्वो गाडीतच? सचिन वाझे ATS जबाबात खोटं बोलले

Next

मुंबई : मनसुख हिरेन यांच्या  हत्येच्या कटासाठी वापरलेले सिम कार्ड गुजरातच्या एका कंपनीच्या नावावर खरेदी केल्याची माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या तपासातून समोर आली. एटीएसने दीव दमण येथून व्होल्वो कार जप्त केली, फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून तिची तपासणी सुरू आहे. दरम्यान, सचिन वाझेनेएटीएसला दिलेला जबाबही खोटा असल्याची माहिती एटीएस प्रमुख जयजित सिंह यांनी मंगळवारी दिली.

मनसुख हिरेन यांची पत्नी विमला यांच्या तक्रारीवरून ७ मार्च रोजी हत्येचा गुन्हा नोंदवत एटीएसने तपास सुरू केला. विमला यांनी सचिन वाझेवर हत्येचा संशय व्यक्त केला. ८ मार्च रोजी वाझेचा जबाब नोंदविला. वाझेने सर्व­ आरोप फेटाळून लावले. तसेच स्कॉर्पिओ वापरली नसून मनसुख यांनाही ओळखत नसल्याचे सांगितले होते.

तपासात वाझेने दिलेली माहिती खोटी असल्याचे स्पष्ट झाल्याचे सिंह यांनी सांगितले. पुढील तपासात वाझेच्या सांगण्यावरून बुकी नरेश गोर याने विनायक शिंदेला सिमकार्ड पुरवले. गोर याने गुजरातमधील एका व्यक्तीकडून एकूण १४ सिमकार्डे मिळविली. शिंदेने यातील काही सिमकार्डे सुरू करून अन्य साथीदारांना दिली. याच सिमकार्डचा वापर करून शिंदेने मनसुख यांना घटनास्थळी बोलावून घेतले होते; तर काही सिमकार्ड आणि फोन त्यांनी नष्ट केल्याची माहिती समोर आली. यात,  दोघांचा सहभाग असल्याचे स्पष्ट होताच २१ मार्च रोजी त्यांना अटक करण्यात आली. हे सिमकार्ड गुजरातमधील एका कंपनीच्या नावावर खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. 

घटनास्थळी नेऊन गुन्हा कसा घडला याचे केले प्रात्यक्षिक

सिम कार्ड पुरविणाऱ्या व्यक्तीला एटीएसने ताब्यात घेऊन मंगळवारी मुंबईत आणले. गुन्ह्यात वापर झाल्याच्या संशयातून दीव दमण येथून एक व्होल्वो कारही पथकाने जप्त केली. शिवाय कलिना येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने कारची तपासणी सुरू आहे. विनायकचा हत्येच्या कटात प्रत्यक्ष सहभाग असल्याचेही एटीएसने सांगितले. शिंदेला घटनास्थळी नेऊन त्यांनी गुन्हा कसा केला याचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले. तसेच त्याचे घर, कार्यालय, गोडावूनमध्ये झाडाझडती घेण्यात आली. हाती लागलेल्या माहितीच्या आधारे अधिक तपास सुरू असल्याची माहिती सिंह यांनी दिली. 

हिरेन यांची हत्या व्होल्वो गाडीतच केल्याचा संशय, विनायक करायचा हफ्ता वसुली

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात दीव दमण येथून जप्त केलेली व्होल्वो कार ४ मार्च रोजी सचिन वाझेने काही कामानिमित्त ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. याच वाहनात मनसुख यांची हत्या केल्याचा संशय एटीएसला आहे. त्या दिशेने अधिक तपास सुरू असल्याची माहिती एटीएस सूत्रांकडून मिळाली. एटीएसने जप्त केलेली गाडी दमण येथील अभिषेक अग्रवाल यांची आहे. त्यांचा सायकल विक्रीचा व्यवसाय आहे. याच व्यवसायात वाझेही भागीदार होता. वाझेने कामानिमित्त ४ मार्च रोजी ही गाडी स्वतःकडे घेतली होती, अशीही माहिती समोर येत आहे. अशात, ४ मार्च रोजी विनायक शिंदेने बनावट सिमकार्डद्वारे तावडे नावाने मनसुख यांना कॉल करून बोलावून घेतले. पुढे, याच वाहनात मनसुख यांची हत्या केल्याचा संशय एटीएसला आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने याबाबत अधिक तपासणी सुरू आहे.

पॅरोलवर बाहेर आल्यानंतर सुरू होती हफ्ता वसुली
२००७ मध्ये वर्सोवा येथे झालेल्या लख्खन भैया एन्काऊंटर प्रकरणात विनायक शिंदेला जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याला या प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे मे २०२० मध्ये तो पॅरोलवर बाहेर आला. त्यानंतर तो वाझेच्या बेकायदा कामात सहकार्य करत हाेता. तसेच पोलीस ओळखपत्राच्या आधारे तो मुंबईसह ठाण्यातील पब, हुक्का पार्लर, बार मालकाकडून हफ्ते वसूल करत असल्याची धक्कादायक माहिती एटीएसच्या हाती लागली आहे. त्यानुसार पथक अधिक तपास करत आहे.

Web Title: Mansukh Hiren Death: Mansukh Hiren killed in a Volvo car? Sachin Waze lied in reply to ATS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.