Mansukh Hiren Death: मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडताच ५ मोबाइल नष्ट केल्याची सचिन वाझेची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 01:46 AM2021-03-28T01:46:40+5:302021-03-28T06:09:38+5:30

Sachin Vaze: सचिन वाझे १३ मार्चपासून एनआयएच्या ताब्यात आहे.  त्याच्याकडून या कटाचे सर्व गूढ उलगडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो माेबाइलचे एकूण १३ सिमकार्ड वापरत होता

Mansukh Hiren Death: Sachin Waze confesses that 5 mobiles were destroyed as soon as Mansukh Hiren's body was found | Mansukh Hiren Death: मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडताच ५ मोबाइल नष्ट केल्याची सचिन वाझेची कबुली

Mansukh Hiren Death: मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडताच ५ मोबाइल नष्ट केल्याची सचिन वाझेची कबुली

googlenewsNext

मुंबई : स्फोटक कार व मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे आता हळूहळू राष्ट्रीय तपास यंत्रणेला आपल्या कृत्याची कबुली देऊ लागला आहे. हिरेनचा मृतदेह सापडल्यानंतर त्याने आपले ५ मोबाइल नष्ट करून टाकले होते. मोबाइलमधील डाटा आणि सीडीआर तपासले गेल्यास आपले पितळ उघडे पडेल, या भीतीने हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिल्याचे  सूत्रांनी सांगितले.

सचिन वाझे १३ मार्चपासून एनआयएच्या ताब्यात आहे.  त्याच्याकडून या कटाचे सर्व गूढ उलगडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो माेबाइलचे एकूण १३ सिमकार्ड वापरत होता. त्यासाठी त्याच्याकडे पाच हँडसेट होते. मात्र हिरेनचा मृतदेह सापडल्यानंतर त्याने पाचही मोबाइल नष्ट करून टाकले. त्यामध्ये कार्यालयातील कामासाठी, वरिष्ठांशी बोलण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोबाइलचाही समावेश होता. सुरुवातीला तपास यंत्रणेला तो आपला मोबाइल हरविला असून ताे कुठे हरवला, हे आठवत नसल्याचे सांगत होता. मात्र आता त्याने पाचही मोबाइल स्वतःहून नष्ट करून टाकल्याची कबुली दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मोबाइलमधील डाटा मिळवण्यासाठी एनआयए प्रयत्न करत असून यासाठी काही तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. 

दरम्यान, एनआयएने एका हॉटेल व्यावसायिकाचा जबाब नोंदवला आहे.  त्याने आपण ३ मार्चला वाझेला हफ्ता देण्यासाठी गेलो असता तेथे हिरेन, अटक कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि क्राइम ब्रांचमधील पोलीस निरीक्षक यांच्यात चर्चा सुरू असल्याचे पाहिले होते, असे सांगितले. एनआयए त्या पोलीस निरीक्षकाची चौकशी करणार आहे. याशिवाय एनआयएला एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचीही चौकशी करायची आहे. त्याने दक्षिण मुंबईतील एका व्यावसायिकाला फोन करून वाझेच्या फाइव्ह स्टार हॉटेलमधील वास्तव्यासाठी १३ लाखांचे बिल भरण्यास सांगितले होते. 

व्यावसायिकाने एनआयएला दिलेल्या माहितीनुसार, एका सराफाने ५० ते ६० लाखांची फसवणूक केल्याची तक्रार आपण केली होती. हॉटेलचे बिल भरले तर वाझे  पैसे परत मिळवण्यात मदत करेल, असे अधिकाऱ्याने आपल्याला सांगितले होते, याबाबत दोन निरीक्षक व एका वरिष्ठ अधिकाऱ्याची लवकरच चौकशी केली जाणार असल्याचे समजते.

पोलीस आयुक्तालयाचा डीव्हीआर गायब करण्यामागे नेमके कोण?

  • मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातून डीव्हीआर गायब झाला. त्यामागे तत्कालीन आयुक्त आहेत का, याची चौकशी एनआयएने करावी. ते करत नसल्यास राज्य सरकारने चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी शनिवारी केली. 
  • १० मार्चला पोलीस आयुक्त कार्यालय परिसराचा डीव्हीआर एटीएसने अधिकृत ताब्यात घेतला; दोनच तासांत एटीएसचे प्रमुख जयजितसिंह यांना परमबीर सिंग यांच्या कार्यालयातून फोन गेला, डीव्हीआरमध्ये स्पष्ट दिसत नाही, तपासून परत देऊ, असे म्हणत ताे परत मागवला. त्यानंतर डीव्हीआर गायब झाला. याची एनआयए चौकशी का करत नाही, असा सवाल सावंत यांनी केला.
  • डीव्हीआरमध्ये स्कॉर्पिओ, इनोव्हा गाड्यांची ये-जा, सचिन वाझे व इतर कोणाच्या संपर्कात होते, हे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे महत्त्वाचा पुरावा गायब केला, हे स्पष्ट आहे. तरीही गेल्या १८ दिवसांत एनआयएने वाझेच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला जबाबासाठी बोलावले नाही, हे आश्चर्यकारक असल्याचे सावंत यांचे म्हणणे आहे. भाजपने सिंग यांच्या चौकशीची मागणी करणे थांबवले आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन हत्या याकडून दुसरीकडे लक्ष जावे, हा भाजपचा प्रयत्न असल्यानेच इतर प्रकरणांवर आरोप केले गेले, असा दावाही सावंत यांनी केला.

Web Title: Mansukh Hiren Death: Sachin Waze confesses that 5 mobiles were destroyed as soon as Mansukh Hiren's body was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.