Mansukh Hiren Death: सचिन वाझे बनावट नावानं ‘पंचतारांकित’मध्ये! 'त्या' २ बॅगेमध्ये काय? तपासाला वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 03:12 AM2021-03-23T03:12:56+5:302021-03-23T05:58:55+5:30
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण - वाझे याने एस. एस. गावडे या नावाच्या आधारकार्डचा हवाला देऊन हॉटेलात मुक्काम केला. त्या कार्डवर त्याचा फोटो होता. त्यामुळे त्याने बनावट कार्डही बनविली असल्याचे उघड झाल्याचे सांगण्यात आले.
मुंबई : स्फोटक कार प्रकरणी एनआयएच्या अटकेत असलेल्या सचिन वाझेकडील तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान तो हॉटेल ट्रायडन्टमध्ये बनावट नावाने वास्तव्याला होता. या काळात त्याने अनेकांशी भेट घेतल्याचे समजते. तपास अधिकाऱ्यांनी हॉटेल व तो उतरलेल्या रूमच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व हॉटेलमधील नोंदी ताब्यात घेतल्या आहेत.
वाझे याने एस. एस. गावडे या नावाच्या आधारकार्डचा हवाला देऊन हॉटेलात मुक्काम केला. त्या कार्डवर त्याचा फोटो होता. त्यामुळे त्याने बनावट कार्डही बनविली असल्याचे उघड झाल्याचे सांगण्यात आले. वाझे १६ तारखेला इनोव्हातून हॉटेलमध्ये आला होता. त्याच्याकडे दोन बॅगा होत्या. त्यामध्ये रोकडसह अन्य काही कागदपत्रे असावीत असा संशय आहे. २० तारखेला त्याने रूम सोडल्यानंतर दुसऱ्या एका कारमधून निघून गेल्याची माहिती आहे. त्याने खोटे नाव का वापरले, त्याने अँटिलियाच्या परिसरात जिलेटीनच्या कांड्या असलेली स्काॅर्पिओ ठेवण्याचा कट रचला का, चार दिवसांच्या वास्तव्यात त्याने काय केले, कोणाशी भेटीगाठी घेतल्या, याबाबत माहिती घेतली जात आहे.
१४ सिमकार्ड पुरविणारा गुजरातमधून ताब्यात
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, गुजरातहून १४ सिमकार्ड पुरविणाऱ्या व्यक्तीला राज्य दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे याप्रकरणी कसून चौकशी सुरू आहे. हिरेन मृत्यू प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आल्याचा दावा एटीएसने केला. यात वाझे हा मुख्य आरोपी असून, त्याच्या दोन साथीदारांंना रविवारी अटक केली.
दिल्लीहून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक
एटीएसने हिरेन मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळविले. त्यामध्ये वाझेचा ताबा मागितला आहे. त्यामुळे एनआयए स्फोटक प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करणे व हत्येचा गुन्हा घेण्यास हालचाली सुरू केल्या. त्याबाबत तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक मुंबईत येणार असल्याचे सांगण्यात आले.