Mansukh Hiren Death:...तर हिरेन मृत्यूप्रकरणातील वरिष्ठांपर्यंच्या धाग्यादाेऱ्यांचा छडा लावू - एटीएसला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 06:01 AM2021-03-23T06:01:23+5:302021-03-23T06:01:49+5:30
या प्रकरणाचे धागेदोरे गुजरातपर्यंत पोहोचले आहेत. वाझेला पूर्ण सहकार्य करणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यालाही या गुन्ह्याची माहिती असू शकते, हे नाकारता येत नाही
जमीर काझी
मुंबई : स्फोटक कारसंबंधी ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणातील गूढ उकलण्यात दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) यश मिळाल्याने बॅकफूटवर गेलेल्या राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. या गुन्ह्याचा तपास आपल्याकडे राहिल्यास त्याचे धागेदोरे एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पोहोचू शकतील, असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) न सोपविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी करण्यात आली आहे.
सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर जाऊन एटीएसचे प्रमुख जयजीत सिंह यांनी हिरेन मृत्यू प्रकरणाच्या आत्तापर्यंतच्या तपासाची माहिती त्यांना दिली. या वेळी हा तपास एनआयएकडे वर्ग झाल्यास त्याच्या गतीला खीळ बसू शकेल, त्यामुळे एटीएसकडे तपास राहावा, यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. एटीएसचे उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांनी सहकाऱ्यांसमवेत अथक परिश्रम घेऊन या गुन्ह्याचा छडा लावला. सचिन वाझेचे साथीदार बडतर्फ कॉन्स्टेबल विनायक शिंदे, क्रिकेट बुकी नरेश गोर यांना अटक करून पूर्ण कट उघडकीस आणला.
या प्रकरणाचे धागेदोरे गुजरातपर्यंत पोहोचले आहेत. वाझेला पूर्ण सहकार्य करणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यालाही या गुन्ह्याची माहिती असू शकते, हे नाकारता येत नाही. त्यामुळे वाझेकडे चौकशी केल्यास आणखी धक्कादायक बाबी पुढे येतील, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
शिंदे हा वाझेचा ‘कलेक्टर’
लखनभय्याच्या खोट्या चकमकीत शिक्षा झालेला कॉन्स्टेबल विनायक शिंदे हा पेरॉलवर बाहेर आल्यापासून सचिन वाझेच्या संपर्कात होता. त्याच्याकडे ३२ बार, क्लबच्या नावांची यादी मिळाली. वाझेसाठी वसुली करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. त्यामुळे त्याच्याकडील कसून चौकशीतून मुंबईतील पोलिसांच्या वसुलीचे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.