Mansukh Hiren: मनसुख हिरेन हत्याप्रकरणी आणखी दोघांना अटक; आतापर्यंत ७ जणांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 09:09 AM2021-06-16T09:09:12+5:302021-06-16T09:09:21+5:30
आतापर्यंत चार पोलिसांसह एकूण ७ जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार वाझे, रियाजुद्दीन काझी व निरीक्षक सुनील माने या तिघांची बेशिस्त व गैरकृत्याबाबत पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई पोलीस दलासह राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिलेल्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आणखी दोघांना अटक केली आहे. संतोष आत्माराम शेलार व आनंद पांडुरंग जाधव अशी त्यांची नावे असून, दोघे मालाडमधील कुरार व्हिलेज परिसरात राहणारे आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेच्या सांगण्यावरून ते या कटात सहभागी झाले असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी आतापर्यंत चार पोलिसांसह एकूण ७ जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार वाझे, रियाजुद्दीन काझी व निरीक्षक सुनील माने या तिघांची बेशिस्त व गैरकृत्याबाबत पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर कॉन्स्टेबल विजय शिंदेला लखन भय्या एन्काउंटर प्रकरणात यापूर्वीच बडतर्फ करण्यात आले आहे.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे अँटिलिया निवासस्थान असलेल्या कारमायकल रोड परिसरात जिलेटीनच्या कांड्या असलेली स्कार्पिओ २४ फेब्रुवारीला पार्क करण्यात आली होती.
त्या कटात वाझेसह सहभागी असलेले ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांची ४ मार्चला हत्या करण्यात आली हाेती. याबाबत काझी व सुनील माने यांच्यासह पाच जणांना एनआयएने अटक केली. त्यांच्याकडील चौकशीतून संतोष शेलार व आनंद चव्हाणचा शोध सुरू होता. अखेर त्यांना अटक करण्यात आली.
हत्येवेळी गाडीत असल्याचा संशय!
nफरार असलेले दोघे उपनगरात एका ठिकाणी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सोमवारी त्या ठिकाणी छापा मारून अटक केली. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता २१ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली.
nवाझेच्या सूचनेनुसार दोघे मनसुख यांच्यावर पाळत ठेवून होते. हत्येवेळी ते गाडीत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे समजते.