नीरजच्या दुसऱ्या ‘सीम’मध्ये अनेक ‘राज’; २८ आमदारांहून अधिकांना संपर्क : ‘सीडीआर’वरच काम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 08:29 AM2023-05-22T08:29:29+5:302023-05-22T08:30:14+5:30
गुजरात व दिल्लीमध्ये वापरण्यात आलेल्या त्या ‘सिम’मध्ये त्याची अनेक गुपिते असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यानंतर मंत्रिपदाचे आमिष दाखवत आमदारांना जाळ्यात ओढणारा गुजरातमधील नीरजसिंह राठोड याची सलग चौथ्या दिवशी
गुन्हे शाखेकडून कसून चौकशी करण्यात आली. त्याच्या मोबाइलचा तांत्रिक तपासही करण्यात येत आहे. आतापर्यंत एका सिमकार्डच्या ‘सीडीआर’च्या तपासातून त्याने २८ हून अधिक आमदारांना संपर्क केल्याची बाब स्पष्ट झाली आहे. मात्र त्याच्याकडे असलेल्या दुसऱ्या ‘सिम’ला अद्याप हात लावण्यात आलेला नाही. गुजरात व दिल्लीमध्ये वापरण्यात आलेल्या त्या ‘सिम’मध्ये त्याची अनेक गुपिते असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत मंत्रिपदाचे आमिष दाखवत आमदारांशी बोलणाऱ्या नीरजने मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, कामठीचे आमदार टेकचंद सावरकर, हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे, जालन्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे, तसेच गोवा येथील आमदार प्रवीण अगलेकर आणि नागालँडचे आमदार बाशा चँग यांच्याशी संपर्क साधला होता.
तपासादरम्यान हा आकडा वाढला व २८ हून अधिक आमदारांना संपर्क केल्याची बाब समोर आली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिस अधिकारी सांगत आहेत.
सद्य:स्थितीत त्याच्या मोबाइलमधील महिनानिहाय ‘सीडीआर’ तपासण्यात येत आहे. त्यातून आमदारांची नावे समोर आली आहेत. तपासात अडथळा नको म्हणून ही नावे गुप्त ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कुंभारेंकडून पुरावे घेतले
गुन्हे शाखेच्या पथकाने आमदार विकास कुंभारे यांच्याकडून नीरजच्या फोन कॉल्सशी संबंधित स्क्रीनशॉट्स, मेसेजेस व कॉल रेकॉर्डिंग असे पुरावे घेतले आहेत.
इतरही आमदारांना यासाठी संपर्क करण्यात येणार आहे.
सद्य:स्थितीत एकाही आमदाराला जबाब नोंदविण्यासाठी बोलाविण्यात आलेले नाही.
अगोदर नीरजच्या फोनची पूर्ण तपासणी करण्यावर पोलिसांचा भर आहे. त्यानंतर आमदारांशी संपर्क साधण्यात येईल.