हार्डडिस्क डेटा तपासणीनंतर उलगडणार अनेक रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 08:08 PM2019-02-08T20:08:39+5:302019-02-08T20:10:07+5:30
आयकरची धाड : बँक लॉकरमधून आणखी अडीच किलोचे सोने जप्त
अमरावती - आयकर विभागाच्या अधिकाºयांनी गुरुवारी सील केलेले बँक लॉकर उघडून आणखी अडीच किलोचे सोने जप्त केल्याची माहिती पुढे आली आहे. आयकर अधिकाऱ्यांनी १६ जानेवारी रोजीच्या धाडसत्रात जप्त केलेल्या हार्डडिस्कच्या तपासणीनंतर बिल्डर, उद्योगपती व व्यापाऱ्यांनी लपवून ठेवलेल्या माहितीचे अनेक रहस्य उलगडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आयकर अधिकाºयांच्या २७ पथकाने एकाचवेळी शहरातील बिल्डर प्रवीण मालू, शंकरलाल बत्रा, पनपालीया बंधू, कैलास गिरुळकर, तलडा बंधू, अशोक सोनी यांचे घर, कार्यालये व व्यापारी प्रतिष्ठानांवर धाडसत्र राबविले. या धाडीत अडीच कोटींची रोख जप्त करून बँक लॉकरमधून दोन किलोचे सोन्याचे दागिने जप्त केले. याशिवाय आयकर अधिकाºयांनी बिल्डर, व्यापारी व उद्योगपतींच्या घर, कार्यालय व प्रतिष्ठानांतून संगणकांची हार्डडिस्क, मोबाईल डेटा व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले. गुरुवारी सकाळी नागपूर येथून आयकरचे अधिकारी अमरावतीत दाखल झाले. त्यांनी सेंट्रल बँक आॅफ इंडिया येथील सील केलेल्या लॉकरची झडती घेऊन अडीच किलो सोन्याचे दागिने जप्त केले. ते दागिने घेऊन अधिकारी नागपूर रवाना झाले. आता आयकर अधिकारी बिल्डर, व्यापारी व उद्योगपतींकडून जप्त केलेल्या दस्तऐवज व हार्डडिस्कची तपासणी करीत आहेत. दस्ताऐवज, मोबाईल डेटा व हार्डडिस्कमध्ये बिल्डर, व्यापारी व उद्योगपती यांच्या आर्थिक व्यवहारांची इत्थंभूत माहितीच्या आधारे त्यांनी कोणाकोणाशी रोखीचे व इतर व्यवहार केले, त्यामध्ये किती आयकर बुडविला, याचे विश्लेषण केले जाईल. बिल्डर, व्यापारी व उद्योगपतींनी शासनाचा किती कर बुडविला, याची माहिती उघड झाल्यानंतर आयकर विभागाची पुढील कारवाईची दिशा ठरणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.