अभिनेत्री भाग्यश्री मोटेची उच्च न्यायालयात धाव, बहिणीच्या मृत्यृ प्रकरणाचा तपास CBI कडे सोपविण्याची मागणी
By नारायण बडगुजर | Published: September 23, 2023 09:36 PM2023-09-23T21:36:28+5:302023-09-23T21:37:01+5:30
वाकड येथे १२ मार्च २०२३ रोजी संशयास्पदरित्या झाला होता मृत्यू
नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिची मोठी बहीण मधू मार्कंडेय हिचा वाकड येथे १२ मार्च २०२३ रोजी संशयास्पदरीत्या मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांकडून योग्य तपास झाला नसल्याचा दावा भाग्यश्री करीत आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा म्हणून भाग्यश्रीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मधु यांच्या मृत्यूच्या तीन आठवड्यांपूर्वीच त्यांचे पती संकेत मार्कंडेय यांचे निधन झाले होते. मधु या केक बनविण्याचा वर्कशॉप घेणार होत्या. त्याकरिता त्यांची एका महिलेशी ओळख झाली होती. या महिलेच्या म्हणण्यानुसार केक वर्कशॉपसाठी त्यांना एक खोली आवश्यक होती. तेव्हा ती खोली पाहण्यासाठी घटनास्थळी मधू आणि संबंधित महिला गेली होती. त्यावेळी मधु चक्कर येऊन कोसळल्या. मधु यांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते.
वाकड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. घटनास्थळी मिळालेला मधु यांचा मोबाईल पॅटर्न लॉक असल्याने न्याय वैद्यक विभागाला अद्याप उघडता आलेला नाही. नैसर्गिकरीत्या (हार्ट डीसिज) अर्थात वैद्यकीय तांत्रिक भाषेनुसार हृदय रोगाशी संबंधित अचानक झालेल्या त्रासाने मधू यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद आहे.
जिवाला धोका उत्पन्न करू, असे म्हणून सासरकडील काही व्यक्तींनी मधू यांना धमकाविले होते, अशी माहिती मधु यांनी भाग्यश्रीला दिली होती. त्या अनुषंगानेही तपास व्हावा, अशी मागणी भाग्यश्रीने केली. मधूचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. मोबाईलमध्ये काही पुरावे आहेत का? घटनेच्या वेळी तेथे अन्य कोणी होते का; याचा तांत्रिक सहाय्यकामार्फत तपास झाला का? आदींबाबतची विचारणा भाग्यश्रीने पोलिसांकडे केली. याबाबतची आवश्यक कागदपत्रे मिळावीत यासाठीही माहिती अधिकारामध्ये अर्ज केला होता. बहिणीला न्याय द्या, अशा आशयाची भाग्यश्रीने सोशल मीडियावर पोस्ट केली.
या प्रकरणाचा आवश्यक तपास झालेला दिसत नाही. सात महिन्यांनंतरही संबंधित यंत्रणेला बहिणीचा मोबाईल उघडून त्यामध्ये काय आहे हे तपासता आलेले नाही. सीबीआयकडे हे प्रकरण सोपवावे यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
- भाग्यश्री मोटे, अभिनेत्री
मधू मार्कंडेय यांच्या मृत्यूबाबत सर्व शक्यता पडताळून तपास केला. भाग्यश्री मोटे यांनी उपस्थित केलेल्या शंकांचाही तपास केला. त्यांना आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून देऊ.
- गणेश जवादवाड, वरिष्ठ निरीक्षक, वाकड पोलिस ठाणे