शॉकींग! अल्पवयीन मुलीची 3.5 लाखांत विक्री करुन लावले लग्न, सहा जणांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 04:49 PM2022-08-29T16:49:20+5:302022-08-29T16:50:53+5:30
मनोज शेलार नंदुरबार - धडगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीची विक्री करीत तिचे लग्न लावून दिले. इच्छेविरुद्ध तिच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप ...
मनोज शेलार
नंदुरबार - धडगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीची विक्री करीत तिचे लग्न लावून दिले. इच्छेविरुद्ध तिच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप करीत मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सोलापूर जिल्ह्यातील चार व धडगाव तालुक्यातील दोन अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुासर, धडगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीला संदीप सुकलाल पावरा, संगिता संदीप पावरा यांनी पाहुणी म्हणून घरी घेऊन जातो, असे सांगून टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर येथे घेऊन गेले. तेथे सुप्रिया महाडिक यांच्या मध्यस्थीने गोविंद नावाच्या व्यक्तिला तीन लाख ६० हजार रुपयांमध्ये विक्री करीत लग्न लावून घेतले.
गोविंद याने मुलीच्या इच्छेविरुद्ध तीन ते चार महिने शारीरिक संबंध ठेवले. ही बाब मुलीच्या वडिलांना माहिती झाल्यावर त्यांनी फिर्याद दिल्याने सुप्रिया महाडिक (रा. टेंभुर्णी, ता. माढा), गोविंद नावाचा व्यक्ती, संदीप सुकलाल पावरा, संगिता संदीप पावरा (रा. राडीकलम, ता. धडगाव), गोविंद नावाच्या व्यक्तीची आई व वडील (रा. आलेगाव, ता. म्हाडा) यांच्याविरुद्ध धडगाव पोलिसात बलात्कार व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार डी. के. महाजन हे तपास करीत आहेत.