अरे देवा! लग्नात गरमागरम पुरी न मिळाल्याने तुफान राडा; दगडफेकीत 4 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 04:32 PM2023-05-03T16:32:10+5:302023-05-03T16:32:48+5:30
लग्न समारंभात गरमागरम पुरी न मिळाल्याने मोठा गोंधळ झाला. वाद इतका वाढला की दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली.
झारखंडमधील गिरिडीहमध्ये एका लग्न समारंभात गरमागरम पुरी न मिळाल्याने मोठा गोंधळ झाला. वाद इतका वाढला की दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणाला ताब्यात घेतले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गिरिडीहच्या मुफस्सिल पोलीस स्टेशन हद्दीतील पतरोडीह सेंट्रलपीठ येथे रात्री काही तरुणांनी लग्न समारंभात गोंधळ घातला. यावेळी दगडफेकीसह धारदार शस्त्रांचाही वापर करण्यात आला. यामध्ये चार तरुण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी पाहणी केली.
एसडीपीओ अनिल कुमार सिंह, मुफस्सिल पोलीस स्टेशनचे प्रभारी कमलेश पासवान, नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी आरएन चौधरी, पोलीस निरीक्षक विनय कुमार राम हे देखील पोलीस दलासह घटनास्थळी पोहोचले आणि संतप्त लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले.
लग्नसमारंभात जेवण न दिल्याने मुद्दाम गोंधळ झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणाने लग्नात वाद निर्माण केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, पतरोडीह येथील शंकर नावाच्या व्यक्तीच्या घरी वरात आली होती.
रात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक तरुण जेवणासाठी पोहोचला आणि गरम पुरीची मागणी करू लागला. यानंतर मोठा वाद झाला. तरुणाने बाहेरून काही साथीदारांना बोलावून गोंधळ घातला. तसेच शिवीगाळ करून दगडफेक केली. याप्रकरणी पोलीस कारवाई करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"