बोहल्यावर चढण्याआधीच काळाने घातला घाला, हळदीच्या दिवशी नवरदेवाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 09:32 PM2020-06-13T21:32:21+5:302020-06-13T21:36:30+5:30
आज हळद, सोमवारी होते लग्न : भिलोना गावात शोककळा
परतवाडा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील भिलोना येथील २९ वर्षीय युवकाचा बोहल्यावर चढण्याआधीच हृदयाघाताने मृत्यू झाला. शनिवारी ही घटना घडली. सागर अण्णा साबळे असे या दुर्दैवी युवकाचे नाव आहे.
या युवकाचा सोमवारी अमरावती येथे विवाह होणार होता. रविवारला त्याला हळद लागणार होती. ठाणे येथे एसटी महामंडळात तो चालकपदावर कार्यरत होता. मागील वर्षीच त्याला ही नोकरी लागली. त्याला आई-वडील नाहीत. घरात तो एकटाच होता. आपल्या विवाहित बहिणीच्या मदतीने तो स्वत:च्या लग्नाची तयारी करीत होता. धावत होता. त्याने अमरावतीला जाऊन खरेदीही केली. लॉकडाऊनपासून तो गावातच मुक्कामी असून बाहेरगावाहून आल्यामुळे त्याने त्यादरम्यान स्वत:ला चौदा दिवस होमक्वारंटाईन करून घेतले होते.
काही दिवसांपूर्वीच त्याचे साक्षगंधही झाले होते. शुक्रवारी सकाळी त्याच्या छातीत दुखायला लागले म्हणून मित्रांसमवेत तो परतवाड्यात डॉक्टरकडे आला. दरम्यान त्याचे छातीचे दुखणे थांबले. डॉक्टरांनी अॅडमिट करून घेतले, तर आपले लग्न राहून जाईल म्हणून तो आपल्या मित्रांसमवेत परत गावात आला. पण, शनिवारी सकाळी त्याच्या छातीत परत दुखायला लागले. मित्रांनी वाहनात टाकून परतवाड्यात आणले. डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
मित्रांनी त्याचा मृतदेह उपजिल्हा रूग्णालयात नेला. तेथे त्याचे शवविच्छेदन केल्या गेले. शनिवारला सायंकाळी ७.३० वाजताचे दरम्यान भिलोना येथील चंद्रभागा नदीच्या तिरी त्याचे पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. या घटनेने सर्व गावात शोककळा पसरली आहे.