लैंगिक संबंध ठेवले म्हणून विवाह बंधनकारक नाही; बलात्कारातील आरोपीला अटकपूर्व जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 10:18 AM2021-08-25T10:18:20+5:302021-08-25T10:19:40+5:30
कोणाशी लग्न करणे ही निवडीची बाब आहे. ती कोणावरही लादली जाऊ शकत नाही. केवळ दोन व्यक्तींनी एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवले म्हणून त्यांनी विवाह करणे बंधनकारक नाही, असे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. पी. एम. गुप्ता यांनी नोंदवले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दोन व्यक्ती केवळ लैंगिकदृष्ट्या एकमेकांत गुंतल्या म्हणून त्यांनी एकमेकांशी विवाह करणे बंधनकारक नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने बलात्काराचा आरोप असलेल्या तिघांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
कोणाशी लग्न करणे ही निवडीची बाब आहे. ती कोणावरही लादली जाऊ शकत नाही. केवळ दोन व्यक्तींनी एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवले म्हणून त्यांनी विवाह करणे बंधनकारक नाही, असे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. पी. एम. गुप्ता यांनी नोंदवले.
तक्रारदार महिलेचे एका आरोपीवर प्रेम होते. आरोपीने तिच्याशी विवाह केला नाही. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सहमती घेतली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला. अटक होईल या भीतीने आरोपींनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.
तक्रारदार ही सज्ञान आहे. सुशिक्षित आहे. त्यामुळे विवाहापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याचे परिणाम काय होऊ शकतात, याची जाणीव तिला आहे. आपली फसवणूक करून सहमती घेण्यात आल्याचे महिलेचे म्हणणे आहे. मात्र, तसे दर्शविणारे पुरावे नाहीत, असे न्यायालयाने म्हटले.
तक्रारीनंतरही ठेवले शारीरिक संबंध
आरोपींचा जामीन अर्ज मंजूर करताना न्यायालयाने म्हटले की, २०१९ मध्ये गुन्हा नोंदवेपर्यंत महिलेने आरोपीबरोबर अनेक ठिकाणी भेट दिली व त्याच्याबरोबर राहिलीही. तक्रार केल्यानंतरही ती आरोपीबरोबर अनेक ठिकाणी गेली व ठाण्यातील अनेक हॉटेल्समध्ये त्याच्याबरोबर राहिली.
सदर प्रकरणातील वस्तुस्थिती लक्षात घेता आरोपीचे तक्रारदार महिलेबरोबर प्रेमसंबंध होते. त्यांनी एकमेकांबरोबर शारीरिक संबंध ठेवले आणि काही कारणास्तव त्यांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले. त्यांच्यात असलेले शारीरिक संबंध हे एकमेकांच्या सहमतीनेच होते, हे निश्चित.