महिलांना लग्नाचे आमिष दाखवित गंडा, हनी ट्रॅपचा प्रकार उघड; भामट्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 09:02 PM2021-07-01T21:02:14+5:302021-07-01T21:03:23+5:30
मॅट्रिमोनीयल साईवरून महिलांना दाखवत होता लग्नाचं आमिष, भामट्याला पोलिसांकडून अटक
डोंबिवली: जीवनसाथी डॉट कॉम या मेट्रोमोनीयल वेबसाईटवर उच्च शिक्षित महिलांना लग्नाचे आमिष दाखवित हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या भामट्याला विष्णुनगर पोलीसांनी अटक केली आहे. चौकशीत आरोपी हा प्रथम माने या खोट्या नावाने अकाउंट उघडून उच्च शिक्षित महिला विशेष करून घटस्फोटीत आणि विधवा महिलांशी ओळख करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवित त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा हे देखील उघड झाले आहे. शैलेश प्रभाकर बांबार्डेकर असे आरोपीचे नाव आहे. त्याला मुंबई, कांदीवली येथून अटक करण्यात आली आहे.
जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशनद्वारे खोटया नावाने ओळख करून जुलै 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत लग्नाचे आमिष दाखविले आणि शारीरिक संबंध ठेवले आणि 10 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याची तक्रार एका महिलेसह अन्य तिघा महिलांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात 16 एप्रिलला केली होती. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहाय्यक पोलीस निरिक्षक योगिता जाधव आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश वडणे, महिला पोलीस नाईक मिथिला मिसाळ, पोलीस शिपाई कुंदन भामरे, मनोज बडगुजर यांचे विशेष पथक नेमले होते. पथकाने कसोशीने तपास करीत आरोपी शैलेशला अटक केली आणि तक्रारदार महिलांकडून घेतलेले 140 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
पोलिसांचे आवाहन
शैलेशने प्रथम माने या नावाने जीवनसाथी डॉट कॉम या मेट्रोमोनीयल वेबसाईटवर कोणाला फसवले असल्यास तत्काळ विष्णूनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. आरोपीने तांत्रिक तपासाच्या आधारे अजून किती महिलांना फसवले आहे याबाबत आमचा तपास सुरू आहे. त्याच्यावर याआधी गुन्हे दाखल आहेत का? याचीही चौकशी सुरू असल्याची माहीती वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे यांनी दिली.