चौदाव्या वर्षी लावले लग्न, अन् पंधराव्या वर्षी मातृत्व; माता-पित्यांसह सासरच्या मंडळींवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 07:28 AM2021-08-01T07:28:38+5:302021-08-01T07:29:10+5:30
याप्रकरणी पाेलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे यांनी फिर्याद दिली आहे. नगर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे तिच्या माता-पित्यांनी मे २०२० मध्ये लग्न लावून दिले.
अहमदनगर : माता-पित्यांनीच अवघे चौदा वर्षे वयाच्या मुलीचे लग्न लावून दिले. लग्नानंतर पंधराव्या वर्षीच मुलीला गर्भधारणा होऊन तिच्यावर मातृत्व लादले गेले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी पीडित मुलीच्या माता-पित्यांसह पती व सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पाेलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे यांनी फिर्याद दिली आहे. नगर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे तिच्या माता-पित्यांनी मे २०२० मध्ये लग्न लावून दिले. तेव्हा तिचे वय चौदा वर्षे होते. लग्नानंतर काही महिन्यांतच तिला गर्भधारणा झाली. या मुलीला तपासणीसाठी काही दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. यावेळी सदर मुलगी अल्पवयीन असल्याचे तेथील डॉक्टरांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले होते. याप्रकरणी चाईल्ड लाईननेही पाठपुरावा केला होता. दरम्यान सदर मुलीस पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथे तिची नुकतीच प्रसूती झाली.पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून आरोपींविरोधात अत्याचार, पोस्को व बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.