अनैतिक संबंधातून विवाहितेची निघृण हत्या; पहाटे पती कामावरून घरी परतला तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 08:33 IST2025-04-23T08:32:45+5:302025-04-23T08:33:00+5:30
एकाच ठिकाणी काम करत असताना शहा आणि सुनमची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले

अनैतिक संबंधातून विवाहितेची निघृण हत्या; पहाटे पती कामावरून घरी परतला तेव्हा...
मुंबई : विक्रोळीत अनैतिक संबंधातून विवाहितेची निघृण हत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अथक प्रयत्न करत बिहारच्या हनासा शफिक शहा (२५) याला अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.
सुनम सूरजलाल माताफेर (३७) असे मृत महिलेचे नाव असून, त्या विक्रोळी पूर्वेकडील मच्छी मार्केट परिसरात राहण्यास होत्या. त्यांचे पती सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. आरोपी शहा हा धारावीत राहण्यास असून, मूळचा बिहारचा रहिवासी आहे. सोमवारी सुनम या घरात एकट्या असताना आरोपीने घरात प्रवेश करत त्यांची गळा चिरून हत्या केली. सकाळी पती कामावरून घरी परतल्यानंतर सुनम रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसल्याने खळबळ उडाली. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले.
मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली. घटनास्थळी मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन, डॉग स्कॉड, फिंगर प्रिंट घेणाऱ्यांकडून पुरावे गोळा करणाऱ्यांनीही शोध सुरू केला. घटनास्थळावरील पुरावे आणि तांत्रिक विश्लेषणावरून पोलिस शहापर्यंत पोहोचले. त्याला ताब्यात घेत चौकशी करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
म्हणून काढला काटा
एकाच ठिकाणी काम करत असताना शहा आणि सुनमची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. यातूनच सुनमने लग्नासाठी तगादा लावला. यावरून दोघांमध्ये वाद होत असत. सोमवारी रात्री पती कामावर गेल्यानंतर शहा घरी आला. लग्नावरून दोघांमध्ये वाद झाले. यातूनच त्याने सुनमची गळा चिरून हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली.
असा आला आरोपी जाळ्यात
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पोलिस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली दहा तपास पथके स्थापन करून आरोपींचा शोध सुरू केला. पुढे तांत्रिक पुराव्याच्या मदतीने पथकाने अवघ्या काही तासांत गुन्ह्याची उकल करत आरोपीला बेड्या ठोकल्या.