पतीशी वाद झाल्याने आंबोली घाटात उचलले टोकाचे पाऊल; अहमदनगरच्या महिलेला २०० फूट दरीतून वाचविले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 11:50 AM2021-06-16T11:50:44+5:302021-06-16T11:51:50+5:30
Amboli ghat news: मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आंबोली बसस्थानकावरून एका युवतीने संजय पाटील नामक रिक्षाचालकाची रिक्षा सावंतवाडीला जायचे आहे, असे सांगून भाड्याने घेतली व ती सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली. यावेळी घाटात तिने रिक्षा थांबवाय़ला सांगितली.
सिंधुदुर्ग: आंबोली घाटाच्या (Amboli ghat) खोल दरीत उडी घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्या कमल रामनाथ इंडे (२५), हिने पती बरोबर झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून आपण हा टोकाचा निर्णय घेतला, अशी कबुली तिने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, दरीत पडल्यामुळे तिच्या अंगावर जखमा झाल्या आहेत. तसेच एक पाय फॅक्चर आहे. त्यामुळे तिला अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे पोलीस निरिक्षक सचिन हुंदलेकर यांनी सांगितले. (Married women of Ahmednagar Tried to suicide at Amboli Ghat. Rescued from 200 feet deep)
मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आंबोली बसस्थानकावरून एका युवतीने संजय पाटील नामक रिक्षाचालकाची रिक्षा सावंतवाडीला जायचे आहे, असे सांगून भाड्याने घेतली व ती सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली. दरम्याने घाटात तिने दरड पडलेल्या ठिकाणी रिक्षा थांबवली व घाटातील नजारा बघावा म्हणून ती घाटातील संरक्षक कठड्यावर चढली. हे बघताच रिक्षाचालकाने तिला खाली उतरण्याची विनंती केली. परंतु तितक्यात तिने चप्पल व ओढणी संरक्षक कठड्यावरच ठेवून खाली उडी मारली. ती जवळपास दोनशे फूट खाली कोसळली हे बघून घाबरलेल्या स्थितीत रिक्षा चालक आंबोली पोलिस स्टेशनला आला. त्यांनी घडलेली घटना आंबोली पोलिसांना सांगितली.
त्यानंतर आंबोली पोलिस स्थानक प्रमुख बाबु तेली, दत्तात्रय देसाई व आंबोली मधील रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते आपत्कालीन व्यवस्थापन कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले व त्यांच्या अथक प्रयत्नानंतर तिला प्रतिकूल परिस्थितीत पाऊस वादळ वारा धोके असतानाही जिवंत व सुखरूप बाहेर काढले. तत्काळ तिला 108 रुग्णवाहिका मधून आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नेण्यात आले.
पोलीस निरीक्षक सावंतवाडी सचिन हुंदळेकर, सहाय्यक पोलिस निरिक्षक तोसिफ्र सय्यद, पोलीस पोलीस उपनिरीक्षक आनंद यशवंते आदी उपस्थित होते. तर आपत्कालीन बचाव समितीतर्फे ही कामगिरी विशाल बांदेकर, अजित नार्वेकर, उत्तम नार्वेकर, संतोष पालेकर, राकेश अमृतकर, अमरेश गावडे, दीपक मिस्त्री, हेमंत नार्वेकर, मायकल डिसोजा यांनी पार पाडली.