हुंड्यासाठी विवाहितेला जाळून मारले; लातूर जिल्ह्यात सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:31 PM2018-09-01T12:31:07+5:302018-09-01T12:32:26+5:30
जयश्री हणमंत मुंडकर (२१) या विवाहितेला हुंड्यासाठी राहत्या घरी रॉकेल टाकून जाळून मारल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.
वाढवणा (लातूर) : चाकूर तालुक्यातील राचन्नावाडी येथील जयश्री हणमंत मुंडकर (२१) या विवाहितेला हुंड्यासाठी राहत्या घरी रॉकेल टाकून जाळून मारल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याबाबत वाढवणा (बु.) पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, नायगाव तालुक्यातील मरवळी येथील जयश्रीचा विवाह २०१६मध्ये चाकूर तालुक्यातील राचन्नावाडी येथील दयानंद हुलप्पा वागलगावे यांच्याशी झाला. लग्नानंतर सहा महिने जयश्रीला सासरच्यांनी चांगले नांदविले. मात्र, हुंड्यातील राहिलेल्या एक लाख रुपयांसाठी पतीसह सासरच्या मंडळींनी शारीरिक, मानसिक छळ सुरु केला. यातूनच गुरुवारी मध्यरात्री घरी अंगावर रॉकेल टाकून जयश्रीला पेटवून देण्यात आले. गंभीर भाजल्याने तिचा मृत्यू झाला. याबाबत विवाहितेचे काका उत्तम मारोती मुंडकर (३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वाढवणा (बु.) पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी पती दयानंद वागलगावे, सासरा हुलप्पा वागलगावे, सासू हारुबाई वागलगावे, दीर पंढरी वागलगावे, नणंद उषा संजय म्हेत्रे, जावई संजय बळीराम म्हेत्रे आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंडित शिरसे हे करीत आहेत.
राखी पौर्णिमेला दिली अंगठी
जयश्रीच्या वडिलांनी तीन लाख रुपये हुंडा, दोन तोळे सोने देऊन, रितीरिवाजाप्रमाणे २०१६ मध्ये राचन्नावाडी येथे लग्न लावून दिले होते. सहा महिने सुखाचा संसार चालला. एक मुलगी झाली. त्यानंतर हुंड्यातील राहिलेल्या एक लाख रुपयांसाठी जयश्रीचा छळ सुरु झाला. मुलीला चांगले नांदवा म्हणून जावयाला राखी पौर्णिमेला पाच ग्रॅमची अंगठीही दिली होती. मात्र, पैशाच्या मागे लागलेल्या सासरच्या मंडळींनी संगनमत करुन माझ्या मुलीचा घात केला, असा आरोप विवाहितेचे वडील हणमंत मुंडकर यांनी केला.