मित्राने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने विवाहितेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 04:17 PM2019-01-03T16:17:31+5:302019-01-03T16:18:02+5:30
फोटो व्हायरल केल्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याने मित्राच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे़.
पुणे : मित्राने खोटी आश्वासने देऊन फोटो व्हायरल केल्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे़. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी आशिष वसंत धिवार (वय २९) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़. आदिती विनोद वाघ (वय २६, रा़ गणेश पार्क, माणिकबाग, सिंहगड रोड) असे या महिलेचे नाव आहे़ याप्रकरणी आदिती यांचे पती विनोद वाघ यांनी फिर्याद दिली आहे़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, वाघ यांचा मुलगा गणेशोत्सव काळात ढोल -ताशा शिकण्यासाठी जात होता़. त्यादरम्यान ४ वर्षांपूर्वी आदिती व आशिष धिवार यांची ओळख झाली होती़. त्यांच्यात मैत्री देखील झाली़ ते दोघे बाहेर फिरायला जात होते़. त्याचवेळी धिवार याने आदिती यांच्याबरोबर फोटो काढले़. या दोघांच्या मैत्रीची कुणकुण तिच्या पतीला लागली़. त्यावरुन वाघ यांनी पत्नीला जाब विचारला़. तेव्हा तिने आपली केवळ मैत्री असल्याचे सांगितले़. त्यामुळे त्यांच्यातील वाद संपुष्टात आला होता़. मात्र, आशिष वारंवार त्या दोघांचे फोटो सर्वत्र टाकून तिची बदनामी करण्याची धमकी देत होता़. तसेच त्याच्याजवळचे फोटो पतीला दाखवण्याची वारंवार धमकी देत होता़. यातील तणावातून आदिती यांनी २१ डिसेंबर रोजी घरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली़. या प्रकाराने विनोद वाघ यांनाही मानसिक धक्का बसला़. त्यांनी पत्नीचे सर्व विधी कार्य झाल्यानंतर त्यांनी तक्रार दिली असून सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करीत आहेत़.
़़़़़़़़